राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या शाब्दिक हल्ला चढवला आहे. रोहित पवार हे अजित पवारांची स्पेस घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र असं सहजासहजी कोणतं स्थान मिळत नाही. त्यासाठी खूप खास्ता खाव्या लागतात. रोहित पवारांनी आपल्या वयाच भान ठेऊन बोलावं, अशा शब्दात हसन मुश्रीफांनी रोहित पवारांवर टीका केली आहे. रोहित पवार हा छोटा बच्चा आहे मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही. रोहित पवार यांनी आपला वयाचे भान ठेवलं पाहिजे, असा सल्लाही हसन मुश्रीफ यांनी रोहित पवारांना दिला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील दोन जागा राष्ट्रवादीच्या आहेत. शिरोळमधून राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आमच्या चिन्हावर लढावं, अशी आमची विनंती आहे. आमच्या विनंतीला यश येईल असे दिसतं आहे. जागा वाटपामध्ये निवडून येणाऱ्याला प्राधान्य दिल पाहिजे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये फार मोठे अंतर आहे. लोकसभा निवडणुकीत खोटं नेरेटिव्ह सेट केला गेला. आता तो मुद्दा राहणार नाही. मात्र लोकसभेनंतर आम्ही जे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे निवडणुकीत मोठा फरक दिसेल आणि महायुतीची सत्ता पुन्हा राज्यात येईल, असा विश्वासही हसन मुश्रीफ यांनी बोलून दाखवला आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत कुणाचं सरकार येईल असं वाटतं? या प्रश्नाचं मुश्रीफांनी उत्तर दिलं आहे. राज्यात आता एकाच पक्षाचे सरकार येणं शक्य नाही. केंद्रात आणि राज्यात सुद्धा प्रादेशिक पक्षांना सोबत घेतल्याशिवाय कोणालाच सत्ता मिळवता येणार नाही, असं हसन मुश्रीफ म्हणाले. तर कागलच्या लढतीवरही त्यांनी भाष्य केलं. मी केलेल्या कामांच्या जीवावर या मतदारसंघातून मी पुन्हा एकदा शंभर टक्के विजयी होणार आहे, असा विश्वास मुश्रीफांनी व्यक्त केला आहे.
शरद पवार साहेब हे माझे दैवत होते, आहेत आणि या पुढेही राहतील. मला पवारसाहेबांना माझ्याबद्दल अजिबात राग नाही. पण माझ्यावर ज्यांनी ही परिस्थिती आणली. त्यांना सोबत घेऊन पवारसाहेब फिरत आहेत. यावर माझा आक्षेप आहे, असं मुश्रीफ म्हणाले.