भूषण पाटील, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर | 13 फेब्रुवारी 2024 : राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. आज ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशोक चव्हाण हे महाराष्ट्र्च्या राजकारणात ‘वजन’ असणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक नेते जाणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. याच यादीत धुळ्यातील आमदार कुणाल पाटील यांचंही नाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. याबाबत आमदार कुणाल पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आपली पुढची राजकीय भूमिका काय असेल? ते भाजपसोबत जाणार आहेत की नाही? याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
पक्ष हा एक विचार असतो. अशी परिस्थिती येते, तेव्हा पक्षात नवीन नेतृत्व तयार होतं. राज्यात सरकार नसतं. तेव्हा कामात अडचणी येतात ही वस्तुस्थिती आहे. सत्तेत नसला की पक्षाकडे तुम्हाला द्यायला ताकत नसते. अशावेळी आपण पक्षासोबत राहायचं असतं. मी तिसऱ्या पिढीचा काँग्रेसची आहे. मी कायम काँग्रेसमध्येच राहणार आहे, असं कुणाल पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
कालपासून मला विचारणा होतेय. पण माझ्या राजीनामाच्या बातमीत कोणताही तथ्य नाही. पक्षाचा कोणीही आमदार राजीनामा देणार नाही किंवा दुसऱ्या पक्षात जाणार नाही. अशोकराव चव्हाण यांचे वलय आहे. त्यांच्या विचारांचे कोणीतरी राजीनामे दिले असतील. जे पक्षाच्या विचारांशी जोडलेले आहे.त ते काँग्रेस सोडतील असं वाटत नाही, असं कुणाल पाटील म्हणाले.
राजकारणात गेल्या पाच वर्षात इतकी स्थित्यांतरं बघितली आहेत की, आता धक्का बसणं बंद झालंय. जे होईल त्यातून मार्ग काढायचा अशी आमची मानसिकता आता झाली आहे. काल वाटतं कोणीतरी पान टपरीवर बसून आमदारांची यादी तयार केली आहे. या यादीमध्ये नाव असलेल्या सहकाऱ्यांशी बोललो. त्यांनी आपली भूमिका मांडली. आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहोत. असंच त्यांनी सांगितलं असल्याचं कुणाल पाटील म्हणाले.