कोल्हापूर: उकाड्याने हैराण झालेल्या कोल्हापूरच्या (Kolhapur) जनतेला अवकाळी पावसाने दिलासा दिला. काल गुरूवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह वीजांची कडकडीट आणि ढगांच्या गडगडाटात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हवेत गारवा पसरला. दरम्यान जोरदार वाऱ्यासह काही वेळातच पाऊस (unseasonal rains) सुरु झाल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. सुमारे एक तास झालेल्या या पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचून राहीलं. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेचा (Kolhapur Municipal Corporation) नालेसफाईचा दावा फोल ठरवल्याचा आरोप शिवसेना नेते आणि माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी केला आहे. त्यामुळे सध्या कोल्हापूरमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान कोल्हापुरात अवघ्या दीड तासात 64.3 मिलिमीटर इतका पाऊस झाला त्यामुळे शहरात पाणी तुंबल्याची स्थिती निर्माण झाल्याच आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी स्पष्ट केलंय.
काल गुरूवारी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसाने कोल्हापूर शहर आणि परिसराला झोडपून काढल होतं. जवळपास तासभर पडलेल्या या पावसामुळे कोल्हापूरकरांची अक्षरशः दैना उडवून दिली. तर तासभर पडलेल्या पावसामुले अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक खोळंबली. तसेच अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड झाली. या झाडांच्या पडझडीमुळे वाहनांचे मोठे नुकसान झालं. तर शहरातील अनेक भागांना तलावाचे स्वरूप आले होते.
दरम्यान याच्या आधी महापालिकेकडून शहरातील भागात पाणी भरू नये म्हणून नाले सफाई करण्यात आली होती. तसा दावाही महापालिका प्रशासनाने आणि प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केला होता. मात्र एकाच पावसात महापालिकेची पोलखोल झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे. यावरून शिवसेना नेते आणि माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी महानगरपालिकवर आरोप केला आहे. यावेळी त्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेचा नालेसफाईचा दावा फोल ठरवल्याचे म्हटलं आहे. तसेच पहिल्याच पावसात शहराचे ही अवस्था असेल पावसाळ्यात काय होईल असा सवाल केला आहे. तर अस माझ्यासह कोल्हापूरची जनता विचारत असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
तर नालेसफाईसाठी लाखो रुपये खर्च केलेले गेले कुठे असा सवाल देखील आता उपस्थित होत असल्याचे ही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान कोल्हापुरात अवघ्या दीड तासात 64.3 मिलिमीटर इतका पाऊस झाला त्यामुळे शहरात पाणी तुंबल्याची स्थिती निर्माण झाल्याच आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी स्पष्ट केलंय. तर नाले सफाईचे काम ही अंतिम टप्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र इथून पुढे अशी स्थिती उद्भवणार की नाही याचे नेमके उत्तर मात्र त्यांना देता आले नाही. त्यामुळे येत्या पावसाळ्यात कोल्हापूरकरांना रामभरोसे राहावे लागणार हे स्पष्ट आहे.
दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र, येणाऱ्या तीन ते चार तासांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला होता. तसेच साधारणपणे 30 ते 40 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहू शकतात असेही सांगण्यात आले होते. तसेच या कालावधीत विजा पडण्याची शक्यता ही वर्तविण्यात आली होती. त्यामुळे या कालावधीमध्ये जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी. शक्यतो प्रवास टाळावा आणि अत्यंत आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावं. असं आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत सर्व नागरिकांना करण्यात आलं होतं.