पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई आणि वाशिमच्या दौऱ्यावर असणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. पंतप्रधान मोदींचा दौरा म्हणजे सरकारी पैशाची उधळपट्टी आहे. यवतमाळ जिल्ह्यात मोदींच्या दौऱ्यावर प्रत्येक ग्रामपंचायतीकडून पाच- पाच हजार रुपये देण्याबाबतचा अध्यादेश काढला होता. ही जुमलेबाजी आता जनता ओळखत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला त्यांच्याकडून कोणतीच अपेक्षा नाही. नरेंद्र मोदी आणि अमित शाह जेवढे महाराष्ट्रात येतील. तेवढा महाविकास आघाडीला फायदा होईल, असं नाना पटोले म्हणालेत. तसंच राहुल गांधी यांच्या दौऱ्यावरही नाना पटोले यांनी भाष्य केलं आहे.
एकीकडे खोटं आणि एकीकडे सत्य अशा दोन गोष्टी आज महाराष्ट्रात पाहायला मिळतील. मोदी 2014 पासून फक्त खोट आणि खोटंच बोलत आहेत. राहुल गांधी सत्याच्या बाजूने आहेत. सत्य परेशान होऊ शकतं. मात्र पराभूत होऊ शकत नाही. ही भूमिका घेऊन राहुल गांधी चालले आहेत. आज मोदींच्या दौऱ्यात ज्या घोषणा होतील. त्या निवडणुकीचे जुमले आहेत हे आता महाराष्ट्राच्या जनतेला कळून चुकलं आहे. त्यामुळे जनता आता यांना पाठिंबा देणार नाही, असं नाना पटोले म्हणालेत.
राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळात समतेची भूमिका घेतली आहे. देशभरात हा समतेचा विचार आता संपत चालला आहे. काही लोक म्हणत आहेत की, देश महासत्ता झाला आहे. पण असा देश कधीही महासत्ता होऊ शकणार नाही. देशात समतेचा आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश शाहू महाराजांनी दिला. त्याला पुन्हा ताकद प्राप्त व्हावी, यासाठी राहुल गांधी कोल्हापूरमध्ये येत आहेत. त्यांचा हा संदेश देशासाठी महत्त्वाचा ठरेल. आजच्या दौऱ्या दरम्यान राजकीय चर्चा होणार नाही. राजकीय चर्चा दिल्लीत होईल, असं नाना पटोले म्हणालेत.
परवापासून जागा वाटपाबाबत आमच्या पुन्हा बैठका सुरू होणार आहेत. आमचा प्रयत्न आहे येत्या दोन-तीन दिवसात जागावाटप पूर्ण होईल. काही विशिष्ठ जागांबद्दलचे प्रश्न आहेत. ते दोन दिवसात आम्ही मार्गी लावू. महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही पुढे जात आहोत. मुख्यमंत्री पदाबाबतच्या चेहऱ्याचा विषय संपला आहे, असंही पटोले म्हणालेत.