रत्नागिरी : कोल्हापूर निवडणुकीतल्या (Kolhapur North Election Result) विजयानंतर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सुचक ट्टिट करत भाजपला (BJP) फटकारलंय. पराभवानंतर पोटनिवडणुकीत भाजपला मिळालेली मते एकट्या पक्षाची असल्याचा दावा भाजपने केला होता. या निवडणुकीत भाजप एकटा नव्हता तर भाजप सोबत आरपीआय, शिवसंग्राम, रासप. जनसुराज्य, रयत क्रांती आणि जनसुराज्य असे पक्ष होते. 77 हजार ही मते फक्त शिवसेनेचीच असतील तर इतर पक्षांची कोल्हापूरच्या निवडणुकीत मते नाहीत का? याच अर्थाने मी ट्विट केल्याचे उदय सामंत यांनी सष्ट केलंय. तसेच नवनीत राणा यांच्याबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नवनीत राणा यांच्यासाठी मातोश्रीचा पल्ला अजून लांब आहे. त्यांनी अमरावतीमधील एखाद्या शाखा प्रमुख किंवा गट प्रमुखचे घर निवडत तारीख सांगावी आणि त्याचे परिणाम काय होतात ते बघावे अशी टीका उदय सामंत यांनी केली आहे. शिवाय ज्यांना राजकीय संस्कृती नाही त्यावर का बोलायचं? असं सांगत उदय सामंत यांनी राणा कुटुंबीयांना उत्तर दिलंय.
लोकशाही मध्ये हार जीत होत असते. कोण कुठे जाणार यावर मला बोलायचं नाही उलट कोल्हापूरच्या जनतेनीच काय ते दाखवून दिलंय. असं सांगत उदय सामंत यांनी नाव न घेता भाजप प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चिमटा काढलाय. कोल्हापूरातील राजकीय वातावरण तापलं होतं ते महाविकास आघाडीनं थंड केलं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ते थंड कसं करायचं हे महाविकास आघा़डीला माहित आहे. महाविकास आघाडीचा पॅटर्न हा राज्यात यापुढे सुद्धा रहाणार असल्याचं मत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलंय.
चंद्रकांत पाटील यांना युवापिढी ट्रोल करतेय. त्यामुळे अच्छे दिन येणार असं सांगणाऱ्यांना युवा पिढी ट्रोल करतेय. कोल्हापूरच्या विजयानंतर हि विधासभा आणि लोकसभेची नांदी असल्याचं मत उदय सामंत यांनी व्यक्त केलंय. काल पार पडलेल्या निवडणुकीत भाजपला कोल्हापुरात मोठ्या परभवाचा सामना करावा लागला आहे. तर सतेज पाटलांनी लावलेली फिल्डिंग पुन्हा एकदा यशस्वी ठरलेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या निवडणुकीवरून राजकारण तापलं होतं. महाविकास आघाडीकडून या ठिकाणी जयश्री जाधव यांनी निवडणूक लढवली तर भाजपकडून सत्यजीत कदम निवडणुकीत लढवत होते. चंद्रकांत पाटलांसह अनेक बडे नेते कोल्हापुरात ठाण मांडून बसले होते. त्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका होताना दिसून येत आहे.