पंचगंगा नदीची पाणी पातळी 40 फूट 4 इंचावर; नदीकाठच्या नागरिकांना आजच स्थलांतर करण्याच्या सूचना

| Updated on: Jul 25, 2023 | 11:37 AM

Kolhapur Panchganga River Flood Water Level : राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे आज उघडण्याची शक्यता; नदीकाठच्या लोकांना आजच स्थलांतरित होण्याच्या सूचना

पंचगंगा नदीची पाणी पातळी 40 फूट 4 इंचावर; नदीकाठच्या नागरिकांना आजच स्थलांतर करण्याच्या सूचना
Follow us on

कोल्हापूर | 25 जुलै 2023 : मागच्या काही दिवसांपासून राज्यात धो-धो पाऊस कोसळतोय. अशात ठिकठिकाणी पाणीच पाणी झाल्याच पाहायला मिळतंय. नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. काही ठिकाणी तर नद्यांना पूर आलाय. लोकांच्या घरात पाणी शिरलंय. अशातच कोल्हापूरकरांसाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. कारण पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे आणि आता पंचगंगा नदी धोका पातळीकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 40 फूट 4 इंचावर आहे. सध्या ही पाणी पातळी स्थिर आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी गेल्या सात तासापासून स्थिर आहे. पंचगंगेची इशारा पातळी 39 फुटांवर आहे. तर धोका पातळी 43 फुटांवर आहे.

स्थलांतराच्या सूचना

पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या स्थिर मात्र खबरदारीचा उपाय म्हणून स्थलांतर करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. तरी नदीकाठच्या गावातील लोकांना आज संध्याकाळपर्यंतच स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

स्थलांतराला सुरुवात

कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील पूर बाधित क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांच्या स्थलांतराला सुरुवात झाली आहे. पूर बाधित लोकांसाठी महानगर पालिकेकडून निवारा केंद्र तयार करण्यात आलं आहे. सुतारवाडा परिसरात राहणाऱ्या 13 कुटुंबांना चित्रदुर्ग मठातील निवारा केंद्रात हलवलं आहे. लहान मुलं आणि प्रापंचिक साहित्यसह नागरिक निवारा केंद्रात दाखल झाले आहेत. पाणी पातळी वाढल्यास पुन्हा काही कुटुंबांना स्थलांतरित केलं जाणार आहे.

राधानगरी धरण तुडुंब

कोल्हापूरमधलं राधानगरी धरण 94 टक्के भरलं आहे. त्यामुळे आज रात्रीपर्यंत राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे.

पावसाचा उसंत

कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून धोधो पाऊस पडतोय. अशात आता आज पावसानं काहीशी उसंत घेतली आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांना जरा दिलासा मिळाला आहे. कोल्हापूरकर आपली दररोजची कामं करण्यासाठी बाहेर पडलेली दिसत आहेत.

राज्यात अतिवृष्टीचा इशारा

राज्यात पुढील पाच ते सहा दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 25 ते 30 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा हवामान विभागाचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं देशभरात सगळीकडे पावसाची शक्यता आहे. राज्यात सगळ्या विभागातील पाण्याची तुट भरून निघेल हवामान विभागाचा अंदाज आहे.

कोणत्या विभागात किती दिवस अलर्ट

कोकण विभागात 25 ते 30 जुलैपर्यंत अतिवृष्टी इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र 26 ते 27 अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात 26 व 27 अतिवृष्टी, विदर्भात 25 ते 28 अतिवृष्टी, 29 आणि 30 जुलै मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे.