भूषण पाटील, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर | 20 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि शिंदे सरकारमधील अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला त्यांनी कडाडून विरोध केला आहे. तसंच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावरही भुजबळ घणाघाती टीका करताना दिसत आहेत. अशातच त्यांच्या या भूमिकेला काही नेत्यांनी विरोध केला आहे. आता तर भाजपचे वरिष्ठ नेते आणि शिंदे सरकारमधील महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीच छगन भुजबळ यांना घरचा आहेर दिला आहे.
ओबीसींच्या हक्कांचा मुद्दा पुढे करून आंदोलन सुरू आहे. याची काहीच गरज नव्हती. विनाकारण दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होत आहे. ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद सुरु झाला आहे. हा वाद निरर्थक आहे. छगन भुजबळ यांनी संयम पाळण्याची गरज आहे. आज त्यांच्याबद्दल लोकं आदराने बोलत आहेत. नंतर मात्र त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करावी लागेल, असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणालेत.
छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन निघावं. मंत्रिमंडळातून बाहेर येऊन मग ओबीसींच्या प्रश्नांवर बोलावं. सरकारमध्ये असताना अशी भूमिका घेणं योग्य नाही. यामुळे सरकारमध्ये एक वाक्यता नाही, असा संदेश जातो. सरकार बाबतची विश्वासार्हता कमी होते. त्यामुळे छगन भुजबळ यांनी राजीनामा दिला पाहिजे. नाहीतर ते ओबीसींसाठी घेत असलेली भूमिका आणि त्यांच्या सुरु असलेल्या सभा याबाबत सरकारने विचार करावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत विचार केला पाहिजे, असं विखे पाटील म्हणालेत.
मराठा आरक्षणासंदर्भात जे आंदोलन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवरती शासनाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता कुणाचंही आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे. त्यासाठी सरकारही प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने सरकारचे प्रयत्नही सुरू आहेत, असंही राधाकृष्ण विखे पाटील म्हणालेत.