विधानसभेच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. 15 ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकांची तारीख जाहीर केली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूका होणार आहेत. तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचा गड मानला जातो. या गडाला कायम राखण्यात पक्षाची फाळणी झाल्यानंतर शरद पवार यांना यश येते का ? हे पाहावे लागणार आहे. कोल्हापूरातील राधानगरी मतदार संघाचे बोलायचे झाले तर येथील विद्यमान आमदार शिवसेनेचे प्रकाश आबिटकर आहेत. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर ते एकनाथ शिंदे गटात गेलेले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत या मतदार संघावर उद्धव ठाकरे क्लेम करणार हे स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे हा मतदार संघ महाविकास आघाडीत नेमका कोणाकडे जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
साल 2008 नुसार झालेल्या मतदारसंघांच्या फेरचनेनुसार राधानगरी मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी आणि भुदरगड हे दोन तालुके आणि आजरा तालुक्यातील आजरा महसूल मंडळाचा अंतर्भाव होतो. राधानगरी हा विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मोडतो. शिवसेनेचे प्रकाश आनंदराव आबिटकर हे राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.ते दोन टर्मचे आमदार आहेत. साल 2019 च्या विधानसभेतही प्रकाश आबिटकर निवडून आले होते. त्यापूर्वी साल 2009च्या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे के.पी.पाटील येथे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यामुळे दोन्ही शिवसेना या ठिकाणी उमेदवार देण्यास इच्छुक तर आहेतच शिवाय राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भाजपातील मंडळीही या मतदार संघावर डोळे ठेवून आहेत. त्यामुळे नेमका कोणाच्या वाट्याला हा मतदार संघ जातो यावर येथील गणिते ठरणार आहेत.
लोकसभा निवडणूकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे शरद पवार यांच्याकडे इच्छुक उमेदवारांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. विधान सभेसाठी इच्छुक असलेले नेते तुतारी वाजविण्यास इच्छुक असल्याचे दिसत आहेत. अशात एकमेकांचे दाजी मेहुणे असलेल्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. हा मतदार संघ जर राष्ट्रवादीकडे गेला तर शरद पवार या दोघांपैकी कोणाला उमेदवारी देतात याकडेही लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणूकांचे निकाल लागल्यानंतर शरद पवार यांना राज्यात दौरे सुरु केलेले आहेत. या दौऱ्यात इच्छुक नेते शरद पवार यांची भेट घेत आहेत.
राधानगरी विधान सभा निकाल – 2019
उमेदवाराचे नाव | पक्ष | एकूण मते | लीड | मतांचा वाटा |
---|---|---|---|---|
आबिटकर प्रकाश आनंदराव | शिवसेना (SHS) | 1,05,881 | 18,430 | 42.86 % |
के.पी.पाटील | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) | 87,451 | 35.40% |
राधानगरी विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या माजी आमदार के.पी.पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यानंतर ए.वाय. पाटील यांनी देखील स्वतंत्रपणे शरद पवार यांची भेट घेतली आहे. के.पी.पाटील हे ए.वाय.पाटील यांचे मेहुणे आहेत. परंतू दोघे एकमेकांचे राजकीय विरोधक देखील आहे. कोल्हापूर लोकसभा निवडणूकीचा निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागला आहे.त्यामुळे महायुतीकडून मिळण्याची शक्यता कमी असल्याने के.पी.पाटील तसेच ए.वाय.पाटील शरद पवार गटाकडून तिकीट मिळविण्यासाठी इच्छुक असल्याचे म्हटले जात आहे. ए.वाय. पाटील यांनी आपण गेली दहा वर्षे निवडणूकीची तयारी करीत आहे. गेल्या दोन वेळा शरद पवार यांनी आपल्याला सबूरीचा सल्ला दिला होता. मात्र, यंदा आपल्याला संधी मिळेल अशी आशा ए.वाय. पाटील बाळगुन आहेत.
एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेले प्रकाश आबिटकर यांना हा मतदार संघ महायुतीत शिवसेनेकडे येईल अशी आशा आहे. त्यामुळे त्यांनी निवडणूकीसाठी जोरदार तयारी केली आहे. तसेच के.पी. पाटील आणि ए.वाय.पाटील यांनी अजित पवार यांची साथ सोडलेली आहे. त्यामुळे महायुतीत हा मतदार संघ जर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळाला तर आपल्याला तिकीट मिळेल असे के.पी.पाटील आणि ए.वाय.पाटील यांना वाटत आहे. हा मतदार संघ शिवसेनेकडे असल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाने देखील त्यावर दावा केलेला आहे. त्यामुळे जागा वाटपात हा मतदार संघ कोणाकडे जातो त्यावर या मतदार संघाचे पुढील गणित ठरणार आहे.
राधानगरी मतदार संघाची जागा एकसंघ शिवसेनेकडे होती. त्यामुळे महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे या जागेवर दावा करणार ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे. ठाकरे गटात आता कोणाला उमेदवारी मिळते आणि ज्याला उमेदवारी मिळणार नाही तो काय करणार या जागेचा निकाल अवलंबून असणार आहे. प्रकाश आबिटकर यांना महायुतीने उमेदवारी दिल्यास त्यांना कोणताही विरोध होईल असे चिन्ह नाही. मात्र आघाडीत ही जागा जर शरद पवार गटाकडे गेली तर मेहुण्यातील संघर्ष पुन्हा उफाळणार आहे. यावर ज्येष्ट नेते शरद पवार काय तोडगा काढतात यावर येथील गणित अवलंबून असणार आहे.
राधानगरी हा महाराष्ट्रातील कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदार संघ आहे. 2014 मध्ये शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर येथून निवडणूक जिंकले होते. त्यानंतर पुन्हा 2019 मध्ये शिवसेनेचे प्रकाश आबिटकर पुन्हा निवडणूक जिंकले. गेल्या निवडणूकीत शिवसेनेच्या प्रकाश आबिटकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या केपी पाटील यांचा 18430 मतांनी पराभव केला होता.नुकत्याच झालेल्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहू शहाजी यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या संजय मंडलिक यांचा पराभव करून 1,54,964 मतांनी विजय मिळवला आहे.