लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. कोल्हापूरमधील कसबा- बावडा इथं राहुल गांधी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं. यावेळी राहुल गांधी यांनी उपस्थितांना संबोधित केलं. तेव्हा बोलताना राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. यावर विरोधक वारंवार टीका करताना दिसतात. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते हे उद्घाटन व्हायला हवं होतं, असं विरोधक वारंवार म्हणत असतात. आताही आज कोल्हापुरात बोलताना राहुल गांधींनी यावर भाष्य केलं.
सिंधुदुर्गातील मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला. तो पुतळा कोसळला. मूर्ती तुटली. नियत चुकीची होती. मूर्तीने त्यांना मेसेज दिला. शिवाजी महाराजांची पुतळा बसवणार असाल तर त्यांच्या विचारधारेचं रक्षण केलंच पाहिजे. त्यामुळेच ती मूर्ती पडली. कारण त्यांची विचारधारा चुकीची आहे. ते समोर जाऊन हात जोडतात आणि 24 तास शिवाजी महाराजांच्या विचारांच्या विरोधात काम करतात, असं राहुल गांधी म्हणाले.
राम मंदिराच्या , संसदेच्या उद्धाटनावेळी आदिवासी राष्ट्रपतींना जाऊ दिलं नाही. विचार एकच आहे. विचारात काही फरक पडला नाही. विचारधारा एक आहे. लढाई एक आहे. ही राजकीय लढाई नाही. ही संविधानाची लढाई आहे. या संविधानात शिवाजी महाराज आहे. त्यांचा आवाज आहे. त्यांची विचारधारा आहे, असं म्हणत राहुल गांधींनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
शिवाजी महाराजांच्या विचाराचं संविधान कसं संपवलं जाईल याचा प्रयत्न सुरू आहे. हिंदुस्थानातील संस्थांवर आक्रमण केलं जात आहे, लोकांना घाबरवलं जात आहे. धमकावलं जात आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर माथं टेकतात. त्याला काही अर्थ नाही. तुम्ही शिवाजी महाराजांच्यासमोर नतसमस्तक होता तर तुम्हाला संविधानाचं रक्षण केलं पाहिजे. शिवाजी महाराजांच्या काळातही हीच लढाई सुरू होती. शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सुरू होता,. याच विचारधारेच्या लोकांनी राज्यभिषेक होऊ दिला नाही. ही आजची लढाई नाही. ही हजारो वर्षांपासूनची लढाई आहे. या विचारधारेच्या विरोधातच काँग्रेस लढत आहे, असं राहुल गांधी म्हणालेत.