कोल्हापूर | 16 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीची घोषणा आज दुपारी होऊ शकते. अशात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. कोल्हापूरमधून शाहू महाराज यांना महाविकास आघाडीकडून लोकसभेची उमेदवारी मिळू शकते, अशी शक्यता आहे. राजकीय वर्तुळात आणि महाविकास आघाडीतही तशी चर्चा सुरु आहे. यावर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यानं स्पष्ट शब्दात भाष्य केलंय. शरद पवार मोठे नाते आहेत. शाहू महाराजांना निवडणुकीत उभं करण्याचं शरद पवारांचं षडयंत्र आहे. शरद पवारांना जुना राग काढायचा असेल. पण जनता सुद्धा आता याला तयार आहे, असं म्हणत शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनी पवारांवर टीकास्त्र डागलंय.
माझी उमेदवारी लवकरच जाहीर होईल. माझ्या कार्यकर्त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. मला श्रीकांत शिंदे यांचा फोन आला होता. मला अस्वस्थ आहात का? असं विचारलं. उमेदवारी जाहीर होईल, असं त्यांनी मला सांगितलं आहे. मी उमेदवारी घोषित नसल्याने मेळाव्याला उपस्थित नव्हतो. मी उमेदवार म्हणून घोषित झाल्यावर महायुतीच्या सगळ्या पक्षांचा मेळावा घेईल. मी मुंबईत चंद्रकांत दादा पाटील,हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. समरजित घाटगे यांचीही भेट होत असते. महाडिक यांचेही सकारात्मक बोलणं झालं आहे. अनेक नावे चर्चेत होते. त्यामुळे माझ्या सोबत सरावाच्या कुस्त्या सुरू होत्या, असं संजय मंडलिक म्हणाले.
महाविकास आघाडीकडून शाहू महाराज यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. यावरही संजय मंडलिक यांनी प्रतिक्रिया दिलीय. कोण मोठा कोण छोटा म्हणून निवडणूक नसते. लोक मतदान करत असतात. आतापर्यंत केलेली कामे याचा फायदा होईल, असं मंडलिक म्हणाले.
सतेज पाटील माझे चांगले मित्र आहेत. सतेज पाटील पुन्हा माझ्या स्टेजवर येतील. मागच्या वेळी ते आले होते. व्यक्तिगत हेवा दाव्यातून लोकसभेच्या निवडणूक होऊ नयेत. सतेज पाटील यांना राज्याच्या राजकारणात इंटरेस्ट आहे लोकसभेला वाटत नाही, असं मंडलिक म्हणालेत.