“कोल्हापुरातून गेलेला संदेश राज्यभर जातो हा इतिहास”; ठाकरे गटाच्या नेत्यानं शिवसेनेला थेट इशारा दिला

| Updated on: Mar 01, 2023 | 3:15 PM

खासदार संजय राऊत यांनी 50 खोक्यांवरून पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील आमदारांना त्यांनी डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

कोल्हापुरातून गेलेला संदेश राज्यभर जातो हा इतिहास; ठाकरे गटाच्या नेत्यानं शिवसेनेला थेट इशारा दिला
Follow us on

कोल्हापूर : शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे गटाकडे गेल्यामुळे आता ठाकरे गट आक्रमक झाला आहे. त्यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाकरे गटाच्या शैलीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यावरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात आली आहे. त्यातच खासदार संजय राऊत आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.

कोल्हापूर दौऱ्यावर असताना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेवर निशाणा साधताना राज्यातील राजकारणामध्ये वेगवेगळे बदल होत आहेत.

त्यामुळे आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना राज्याचे नेतृत्व आपल्याला मिळवून द्यायचे आहे असं आवाहन त्यांनी कोल्हापूरच्या जनतेला केले आहे.

राज्यातील बदलत्या राजकारणाविषयी बोलताना त्यांनी कोल्हापूरच्या राजकीय वातावरणाचीही जोरदार त्यांनी चर्चा केली. हे सरकार जास्त दिवस चालणार नाही त्यामुळे उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळवून द्यायची असंही त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना सांगितले.

कोल्हापूरच्या समाजकारण, राजकारणाचा प्रभाव सगळ्या देशावर पडत असतो. एखाद्या चांगल्या गोष्टीची सुरुवात ही कोल्हापूरातूनच सुरु होत असते. त्यामुळे कोल्हापूरातून गेलेला संदेश हा राज्यभर जातो हा येथील इतिहास आहे अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

पक्षातून काही आमदारांनी बंडखोरी केली असली तरी काही नियम हे निसर्गनियमासारखे आहेत. पानगळ झाल्याशिवाय नवीन वसंत फुलत नाही.

त्यामुळे नवीन वसंत फुलायला सुरुवात झाली आहे असा विश्वास व्यक्त करून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आता जोरदार तयारीला लागावे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी महागाईवरूनही शिंदे-फडणवीस सरकावरही जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यात महागाईने टोक गाठले आहे, तर शेतकऱ्यांचीही अवस्था बिकट झाली आहे.

शेतात पिकवलेल्या मालाला योग्य भाव मिळत नाही, कवडीमोल दराने शेतीमाला विकत घेतला जात आहे. त्यामुळे उभ्या पिकावर नांगर फिरवण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर आली आहे.

महागाईवरून राज्य सरकारवर टीका करताना त्यांनी खोक्यांचा विषय काढून त्यांनी शिवसेनेतील बंडखोर आमदारांना त्यांनी पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.