भूषण पाटील, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी | 15 फेब्रुवारी 2024 : मनात आलं म्हणजे विधिमंडळाचे अधिवेशन घेता येत नाही. त्यासाठी प्रोसेस असते. मंत्रिमंडळाची बैठक घ्यावी लागते. त्यानुसार 20 तारखेला अधिवेशन होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी जे वक्तव्य केलं. त्यामुळे आम्ही नाराज नाही. कारण त्यांनी एक आंदोलन उभा केलंय. माझी विनंती आहे की जरांगे पाटील यांनी तब्येतीची काळजी घेऊन आंदोलन करावं. मराठा समाजाला टिकणारं आंदोलन देणार हे आधीच मुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे. नारायण राणे यांनी जे जरांगे पाटील यांच्याबद्दल बोलले आहेत ते त्यांचे व्यक्तिगत मत आहे, असं राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ते कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
मनोज जरांगे पाटील जालन्यातील अंतरवाली सराटी गावात आमरण उपोषण करत आहेत. त्यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. उपोषणामुळे जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. जरांगे पाटील यांना वैद्यकीय उपचाराची नितांत गरज आहे. मनोज जरांगे पाटील त्यांच्या मागण्यावर ठाम आहेत. सरकारने काढलेल्या अध्यादेशाची कायद्यात रूपांतर करून अंमलबजावणी करण्याची जरांगे पाटील यांची मागणी आहे. अंतरवाली सह राज्यात मराठा आंदोलकांवर झालेले गुन्हे परत घ्या. हैद्राबाद गॅझेट स्वीकारावं, या मागण्यांवरही जरांगे पाटील ठाम आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत जरांगे पाटील उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे.
कोल्हापूरमध्ये शिंदे गटाचं दोन दिवसीय अधिवेशन होणार आहे.यावरही उदय सामंत यांनी भाष्य केलं. उद्या दुपारी 12 वाजता शिवसेनेच्या अधिवेशनाला सुरुवात होईल. यायला लागतंय या टॅगलाईन खाली हे अधिवेशन असेल. कोल्हापुरात आमचं ठरलंय, तुमचं ठरलंय हे शब्द माहिती आहेत. मात्र आमचं पक्क ठरलंय आम्हाला काही चिंता नाही. दोन दिवस हे मार्गदर्शन शिबीर असणार आहे, असं उदय सामंत म्हणाले.
शिवदूतची स्थापना या अधिवेशनात केली जाणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन होणार आहे. आई अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन कामाची सुरुवात करतोय. बाळासाहेब ठाकरे हे कोल्हापुरात येऊन आईचा आशीर्वाद घेऊन प्रचार शुभारंभ करायचे. बबनराव घोलप यांच्यामुळे शिवसेनेची महायुतीची ताकद वाढणार आहे. कोल्हापुरातील अधिवेशनात कोणकोणाचे पक्ष प्रवेश होतात ते पाहा, असं विधान उदय सामंत यांनी केलं आहे.