कोलकाता हत्या प्रकरणाचे महाराष्ट्रभर पडसाद; डॉक्टर संपावर, शस्त्रक्रिया रखडल्या

| Updated on: Aug 17, 2024 | 11:39 AM

Maharashtra Doctors Strike For Kolkata Murder Case : कोलकात्यामध्ये झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे देशभर पडसाद उमटत आहेत. महाराष्ट्रातही या घटनेचा निषेध केला जात आहे. ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. डॉक्टरांनीही संप पुकारला आहे, त्यामुळे शस्त्रक्रिया रखडल्यात. वाचा...

कोलकाता हत्या प्रकरणाचे महाराष्ट्रभर पडसाद; डॉक्टर संपावर, शस्त्रक्रिया रखडल्या
कोलकात्यातील घटनेचा महाराष्ट्रभर निषेध
Image Credit source: tv9
Follow us on

पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात एक घटना घडली अन् देश हादरला… कोलकात्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रातही याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. राज्यात ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. तसंच डॉक्टरही संपावर गेलेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील मार्ड संघटनेच्या निवासी डॉक्टरांचा संपाचा आजचा पाचवा दिवस आहे. मागच्या पाच दिवसांसून हे काम बंद आंदोलन सुरू आहे. त्यामुळे शहरातील दोन्ही शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांचे हाल होत आहेत. अनेक रूग्णांना तासनतास प्रतिक्षा करावी लागतेय. तर उपचार न मिळाल्याने काही रुग्णांना परत जावं लागत आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये रूग्णांचे हाल

छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयातील 532 तर मिनी घाटीतील 32 डॉक्टर हे संपावर आहेत. वरिष्ठ डॉक्टर केवळ अत्यावश्यक रुग्णांवर उपचार करत असल्याने अनेक रूग्णांना उपचारा अभावी माघारी फिरावं लागत आहे. दरम्यान सुरू असलेल्या या आंदोलनामुळे घाटी रुग्णालयात रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचं दिसून येत आहे.

मुंबईमधील जेजे हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरांकडून या घटनेच्या निषेधार्त आंदोलन करण्यात येत आहे. केंद्रीय स्तरावर डॉक्टरांच्या सुरक्षेतीसाठी एक कडक कायदा तयार करण्यात यावा, अशी मागणी डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.

पुण्यात कामबंद आंदोलन

पुण्यातही कोलकात्याच्या घटनेचे परिणाम दिसून येत आहेत. देशभरात IMA कडून आज संप पुकारण्यात आला आहे. कोलकत्यात झालेल्या घटनेच्या निषेधार्त इंडियन मेडिकल असोसिएशनकडून आज कामबंद आंदोलन करण्यात आलं आहे. पुण्यातील ससून रुग्णालयाच्या बाहेर IMA आणि निवासी डॉक्टरांकडून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. पुण्यात खाजगी डॉक्टरांनी देखील वैद्यकीय सेवा आणि ओपीडी बंद केली आहे. पुढील 24 तासासाठी IMA कडून देशभरात पुकारण्यात संप आला आहे. IMA सह विविध संघटनाचा बंदला पाठिंबा दिला आहे. अत्यावशक सेवा वगळता वैद्यकीय सेवेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

नांदेडमध्ये डॉक्टरांचं आंदोलन

कोलकाता घटनेच्या निषेधार्थ नांदेडमध्ये शेकडो डॉक्टर रस्त्यावर उतरले आहेत. या घटनेची सीबीआय चौकशी करून आरोपिला फाशी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. तपासात पोलिसांनी हलगर्जी केल्याचा डॉक्टर आंदोलकांचा आरोप आहे. डॉक्टर तरुणीवर अत्याचार करून खून केलेल्या प्रकरणी देशभरात पडसाद उमटत आहेत.

नागपुरातही पडसाद

उपराजधानी नागपुरातील एम्स रुग्णालयाचे निवासी डॉक्टर, वरिष्ठ निवासी डॉक्टर, आंतरवासिता डॉक्टर, पदवीचे विद्यार्थीही पहिल्यांदाच संपात सहभागी आहेत. कोलकात्यात सरकारी रुग्णालयातील डॉक्टर तरुणीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. त्याच्या निषेधार्थ मेडिकल, मेयो शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टर 13 ॲागस्टपासून संपावर आहेत.

जळगावमध्ये निषेध मोर्चा

पश्चिम बंगालमधील महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ जळगाव शहरात डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे कॅण्डल मार्च काढण्यात आला. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांसह विद्यार्थी विद्यार्थिनींचा कँडेल मार्चमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भाजपचे आमदार सुरेश भोळे यांच्यासह भाजप महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते महिलांची कॅण्डल मार्चमध्ये सहभागी झाले होते. धुळे आणि बुलढाणा शहरातही कोलकात्यातील घटनेते पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. डॉक्टरांनी या घटनेचा निषेध केला. मोर्चेही काढण्यात आलेत.