रत्नागिरी : रत्नागिरी-गणेशोत्सवाच्या (Ganpati Festival) जादा फेर्यांमुळे कोकण रेल्वेचे (Konkan railway) वेळापत्रक कोलमडलंय. रेल्वे गाडया दीड ते तीन तास उशिराने धावत आहेत. त्यामुळे चाकरमन्यांना गावाकडे पोहोचण्यासाठी तब्बल 10 ते 12 तासांहून अधिकचा वेळ लागतोय. कोकण रेल्वे (Train Running status) मार्गावरील जवळपास सर्वच गाड्या या उशिराने असल्याचं पाहायला मिळतंय. जवळपास साडेतीन लाख लोक कोकण रेल्वेने गावी दाखल झालेत. गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमनी कोकणात जात असतात. यंदाही होच उत्साह आणि आनंद चाकरमन्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतोय. कोरोनानंतर पहिल्यांदाच कोणत्याही नियमाशिवाय गणेशोत्सव साजरा केला जातोय. त्यामुळे लोकांमध्येही वेगळीच उर्जा दिसून येतेय. मात्र या आनंदावर कोकण रेल्वेच्या लेटमार्कने प्रवाशांचा हिरमोड केलाय.
कोकण रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेस, ओखा एक्स्प्रेस, फेस्टिवल स्पेशल, गणपती स्पेशल, जनशताब्दी, संपर्क क्रांती एक्स्प्रेस, मडगाव गणपती स्पेशल या गाड्यांनी असंख्य प्रवासी करत आहेत. मात्र जादा गाड्यांमुळे कोकण रेल्वेवरील वाहतूक उशिराने सुरु आहे. कोकण रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी एकच ट्रॅक असल्यामुळे अनेक गाड्यांना साईडिंगला थांबावं लागतंय. त्यामुळे कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलंय.
एसटीचे कोकणासाठी 2000 जादा चालक नेमण्यात आलेत. गणेशोत्सवानिमित्त कोकणाकडे जाणाऱ्या एसटीच्या नियमित बस गाड्यांसोबतच जादा गाड्यांचेही आरक्षण मोठ्या संख्येनं करण्यात आलंय. एसटीच्या जादा गाड्या मराठवाडा, खान्देश, विदर्भ आदी भागातून कोकणाकडे वळवण्यात आल्या आहेत. त्यासोबत जादा चालकांची कुमकही मागवण्यात आलीय. तब्बल 2 हजार चालक कोकणासाठी रवाना होणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहतुकीची धुरा सांभाळणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसंच कोकणातील रस्ते, घाट यापासून काही चालक पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. त्यामुळे त्यांना बस सुरक्षितरीत्या चालवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.