सोमवारी रात्री कुर्ल्यात जे घडलं त्याची कोणी कल्पनाही केली नसेल. रात्री 9.50 च्या सुमारार कुर्ला पश्चिमेकडील अंजुम-ए-इस्लाम शाळेजवळील एसजी बारवे रोडवर एका भरधाव वेगाने आलेल्या बसने अनेक गाड्यांना धडक दिली, निष्पाप नागरिकांना चिरडलही. अवघ्या काही क्षणात झालेल्या या अपघातामुळे प्रचंड गदारोळ माजला, वाकड्यातिकड्या चालणाऱ्या बसच्या रुपाने मृत्यू समोर पाहून लोक घाबरले, जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. काही क्षणातंच होत्याचं नव्हतं झालं. 100 मीटरच्या परिसरात त्या बसने 30-40 गाड्यांना धडक दिली, लोकांना चिरडलं. यामध्ये 30 हून अधिक लोक जखमी झाले असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींवर भाभा रुग्णालयासह विविध रुग्णालयात उपाचर सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
अपघातातील मृत आणि जखमींची नावे समोर, संपूर्ण लिस्ट
काल रात्री झालेल्या या अपघातात आत्तापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून 49 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातातील मृतांची आणि जखमींची नावेही समोर आली असून मृतांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कनीस अन्सारी ( वय 55), आफरीन शाह ( वय 19), अनम शेख ( वय 20) , शिवम कश्यप ( वय 18), विजय गायकवाड ( वय 70), फारूख चौधरी ( वय 54) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यापैकी चौघे हे कुर्ला येथील भाभा रुग्णालयात दाखल होते तर एक कोहिनूर रुग्णालयात आणि अन्य एक मृत व्यक्ती हबीब रुग्णालयात होती. या सहा जणांच्या अकस्मात आणि दुर्दैवी मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांच्या शोकाला पारावार उरलेला नाही.
तर बसच्या धडकेमुळे 40 जणांहून अधिक लोक जखमी झाले असून त्यांच्यापैकी काही जणांवर भाभा रुग्णालय, सिटी हॉस्पिटल, कोहिनूर हॉस्पिटल, सेव्हन हिल्स रुग्णालय, हबीब रुग्णालय, सायन हॉस्पिटल, फौझिया रुग्णालय, कुर्ला नर्सिंग होम अशा विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे अशी माहिती समोर आली आहे.
ड्रायव्हरने पहिल्यांदाच चालवली बस, अपघातानंतर लायसन्स जप्त
कु्र्ल्यात ज्या बसमुळे मृत्यूचं हे चांडव सुरू झालं त्या अपघातग्रस्त बसच्या ड्रायव्हरला संजय मोरे याला पोलिसांनी रात्रीच अटक केली असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या चौकशीतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ड्रायव्हर संजय हा अवघ्या 10 दिवसांपूर्वीच, 1 डिसेंबर रोजी बेस्टमध्ये कंत्राटी चालक म्हणून रुजू झाला होता. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याला बस चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता. याआधी त्याने छोटी वाहनं वगैरे चालवली होती,मात्र बस चालवण्याची त्याची कालची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे बस चालवण्याचा अनुभव नसतानाही त्याला चालक म्हणून बेस्टने कसे घेतले, असा सवाल आता उपस्थित होत असून संबंधित अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात येऊ शकते. संजय मोरेला ड्रायव्हर म्हणून कामाला ठेवताना निकष पाळण्यात आले होते का याची चौकशी होणार आहे. बेस्टच्या काही अधिकाऱ्यांची आणि सबंधित कंत्राटदाराची चौकशी होण्याची शक्यता. मोरे याच्याकडे अवजड वाहन चालवण्याचा परवाना असून पोलिसांनी तो ताब्यात घेतला आहे.