सोमवारी रात्री 10 च्या सुमारा कुर्ला पश्चिमेकडे झालेल्या जीवघेण्या बस अपघातामुळे अख्खी मुंबई हादरली. या अपघातात 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 45 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. या अपघातास जबाबदार असलेला बस ड्रायव्हर संजय मोरे ( वय 54) याला काल ( मंगळवारी) न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता कोर्टाने त्याला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आरोपीचा किंवा इतर कोणाचा काही कट अथवा छडयंत्र होतं का याचा तपास करायचा असल्याचे सांगत आरोपीची 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी पोलिसांकडून करण्यात आली होती. आरोपीच्या वकिलांनी त्यावर युक्तिवाद करत विरोध करण्याचा प्रयत्न केला मात्र अखेर कोर्टाने त्याला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
ड्रायव्हर मोरेच्या चौकशीतून धक्कादायक माहिती
त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असून या तपासातून अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यावेळी संजय मोरेने अनेक खुलासे केले. ऑटोमॅटिक गाडी चालवण्याची सवय नसल्याने गोंधळल्याचे सूतोवाच संजय मोरे याने केले. ज्या गाड्यांना क्लच नाही त्या चालवणं अतिशय गैरसोईच असल्याचा जबाबही त्याने पोलिसांना दिला. 9 डिसेंबरला रात्री ज्यावेळी हा अपघात घडला तेव्हा क्लच समजून आपण accelerator दाबला होता, अशी धक्कादायक कबुलीही त्याने पोलिसांसमोर दिल्याची माहिती समोर येत आहे.
संयज मोरे ( वय 54) याला आधी गाडी चालवण्याचा अनुभव असला तरी त्याने यापूर्वी कधीच ऑटोमॅटिक बस चालवली नव्हती. 1 तारखेला ड्युटीवर रुजू झाल्यानंतर पहिल्यांदाच ऑटोमॅटिक बस चालवली, असेही त्याने कबूल केले. त्यामुळे पुरेसा अनुभव असताना एखाद्या ड्रायव्हरला एवढी मोठी बस चालवण्यास कशी दिली, प्रवाशांचा जीव धोक्यात कसा घातला, असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत.
आरटीओ टीमकडून बसची संपूर्ण तपासणी
सोमवारी रात्री हा अपघात घडल्यानंतर काही तासांनंतर वडाळा आरटीओच्या पथकाने घटनास्थळ गाठून अपघात ग्रस्त ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड कंपनीची इलेक्ट्रिक बस मुंबई पोलिसांच्या मदतीने मध्यरात्री 12.30 वाजता अपघातस्थळावरून हटवली, रात्री 1.15 च्या सुमारास ती कुर्ला आगारात नेण्यात आली. त्यानंतर मोटार वाहन निरीक्षक भरत जाधव यांच्या नेतृत्वाखाली आरटीओ पथकाने मंगळवारी सकाळी कुर्ला आगारात अपघातग्रस्त बसची संपूर्ण तपासणी केली. बसचे ब्रेक नीट, व्यवस्थित काम करत असल्याचे यावेळी आढळले. साधारणपणे मोटार वाहन निरीक्षक विहित प्रक्रियेनुसार वाहनांची तपासणी करतात, मात्र घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन डेप्युटी आरटीओ पल्लवी कोठावडे यांनी स्वत: इतर अधिकाऱ्यांसह कुर्ला आगार गाठले व तपासणीवेळी त्या स्वत: तिथे उपस्थित होत्या.
बसचे ब्रेक व्यवस्थित, लाईटही नीट सुरू होते
आरटीओ पथकाने बसची तपासणी केली आहे, परंतु ऑलेक्ट्रा अभियंत्यांच्या अहवालाची प्रतीक्षा करत आहोत, असे महाराष्ट्राचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी पीटीआयला सांगितलं. ‘आमच्या टीमने निर्धारित एसओपीनुसार बसची तपासणी केली आहे. आम्ही आमचा रिपोर्ट मुंबई पोलिसांना देऊ’, असे त्यांनी नमूद केलं. आरटीओ टीमने बसची तपासणी केली असता बसचे ब्रेक नीट काम करच असल्याचे आढळले. मात्र संपूर्ण रिपोर्ट सबमिट करण्याआधी आणखी काही बाबींची तपासणी करणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितलं.
बेस्ट उपक्रमाकडून समितीची स्थापना
9 तारखेला घडलेल्या या अपघाताची सविस्तर चौकशी करण्यासाठी मुख्य व्यवस्थापक (वाहतूक) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. त्यासंदर्भात एक पत्रक समोर आलंय.
‘कुर्ला बसस्थानक (पश्चिम) ते अंधेरी बसस्थानक (पूर्व) या बेस्ट बस मार्ग क्र.ए-३३२. वर नियमितपणे बससेवा चालविण्यात येते. दिनांक ०९ डिसेंबर, २०२४ रोजी सदर बसमार्गावर बस क्र.एम एच ०१ ईएम ८२२८ ही चालविण्यात येत होती. अंदाजे रात्री ०९.३० च्या दरम्यान सदर बसला कुर्ला येथे अपघात झाला. सदर अपघातात ४९ नागरिक गंभीर स्वरुपात जखमी झाले असून त्यांच्यावर मुंबईमधील विविध रुग्णालयात उपचार चालू आहेत. प्राथमिक माहितीमध्ये यापैकी ७ नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
या अपघाताची सविस्तर चौकशी करण्यासाठी मुख्य व्यवस्थापक (वाहतूक) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. या अपघातामधील मृतांच्या नातेवाईकांना तातडीची मदत म्हणून रुपये दोन लाख बेस्ट उपक्रमामार्फत जाहीर करण्यात येत आहेत. तसेच जखमीवर औषधोपचारांचा खर्च बृहन्मुंबई महानगरपालिका व बेस्ट उपक्रम यांच्या मार्फत केला जाईल’ असे त्यात नमूद करण्यात आलं आहे.