कोल्हापूर : दोन दिवसांपूर्वी लडाखमध्ये (Ladakh) सैन्याच्या वाहनाला एक भीषण अपघात (Ladakh Army Accident) झाला. सैन्याला घेऊन जाणारा हा ट्रक थेट नदीत कोसळा. त्यात एकूण 7 जवान शहीद झाली. त्यात महाराष्ट्रातीलही दोन जवान होते. या अपघातात सातारजे विजय शिंदे आणि कोल्हापूरचे प्रशांत जाधव (Prashant Jadhav) हेही शहीद झाले. तुतर्क सेक्टरमध्ये अपघातात मृत्यू झालेल्या भारतीय लष्करातील जवान प्रशांत जाधव यांच्यावर आज त्यांच्या बसर्गे या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहीद प्रशांत जाधव यांना श्रद्धांजली देण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार उपस्थित होते. दरम्यान गडिंग्लज तालुक्यातील बसर्गे या गावांनाही आता विधवा प्रथा बंदीचा कौतुकास्पद निर्णय घेतलाय. शहीद जवान प्रशांत जाधव यांच्या अंत्यसंस्कार पासून याची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे आज अंत्यसंस्कारानंतरही प्रशांत जाधव यांच्या पत्नीच्या कपाळावरील कुंकू कायम राहिलंय.
आज सकाळी आठ वाजता विशेष विमानानं त्यांचं पार्थिव बेळगाव विमानतळावर आणण्यात आलं, तेथून हे पार्थिव त्यांच्या मूळ गावी नेण्यात आले. शहीद जवान प्रशांत जाधव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बसर्गे सर्व पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी केली होती. दरम्यान त्यांचं पार्थिव घरी आणल्यानंतर पत्नी आणि आई-वडिलांनीच केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. त्यांच्या अंत्ययात्रा मार्गात ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करत त्यांना अभिवादन केलं. लडाखमधील या अपघाताने देशाचं कधीच भरून न निघणारे नुकसान केले आहे. मात्र या जवानांचं हे बलिदान देश कधीच विसरणारही नाही.
प्रशांत हे सन 2014 मध्ये बेळगाव येथे 22 मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये भरती झाले होते. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास ते आपल्या बटालियनसह लष्करी वाहनातून परतापूरहून उपसेक्टर हनिफकडे जात होते. यावेळी त्यांची बस खोल दरीतील श्योक नदीत कोसळली. या अपघातात प्रशांत यांचा मृत्यू झाल्याची बातमी दुपारी त्यांच्या गावात पोहोचली. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने कुटुंबीयांना एकच धक्काच बसला. प्रशांत यांचा विवाह जानेवारी 2020 मध्ये झाला होता. त्यांना अकरा महिन्यांची मुलगी आहे. पत्नी पद्मा व मुलगी नियती हिच्यासह ते जामनगर (गुजरात) येथे दोन महिन्यापूर्वी वास्तव्यास होते. गावी वडील शिवाजी व आई रेणुका असा परिवार आहे. प्रशांत यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांना निरोप देताना अनेकांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं होतं.