गरीब महिलांना आर्थिक मदत व्हावी यासाठी राज्यात लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. निवडणुकीपूर्वी सादर करण्यात आलेल्या अंतरीम अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेंतर्गत राज्यातील लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा केले जातात. निवडणुकीची आचारसंहित लागण्यापूर्वीच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले होते. मात्र आता जी चर्चा आहे ती म्हणजे डिसेंबरचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात कधी जमा होणार. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना पाडव्याच्या मुहूर्तावर आनंदाची बातमी दिली आहे. आचारसंहिता सुरू आहे. लाडक्या बहिणींना आपण दर महिन्याला जे पैसे देतो ते आचारसंहितेमध्ये अडकू नये यासाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे आधीच त्यांच्या खात्यामध्ये जमा केले होते. आता वीस नोव्हेंबरला विधानसभेची निवडणूक आहे, तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी होईल. त्यानंतर याच नोव्हेंबर महिन्यात आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबरचा हफ्ता जमा करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.आमचा हेतू स्पष्ट आहे, आम्ही घेणारे नाही तर देणारे लोक आहोत असं म्हणत त्यांनी यावेळी विरोधकांनाही टोला लगावला.
पुढे बोलताना त्यांनी याच योजनेवरून विरोधकांवर देखील जोरदार टीका केली. लाडक्या बहिणी यांना कधीही माफ करणार नाहीत. लाडकी बहीण योजनेत विरोधकांनी आडथळा आणला, ज्यांनी आडथळा आणला त्यांना लाडक्या बहिणी जोडे दाखवतील.आम्ही केवळ 1500 रुपयांवरच थांबणार नाहीत तर जर आम्हाला पुन्हा आशीर्वाद मिळाला तर आम्ही ही रक्कम वाढवणार आहोत.लाडक्या बहिणींना लखपती करण्याचं आमचं स्वप्न असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील ही योजना सुरूच राहणार असल्याचं म्हटलं होतं. मी अर्थमंत्री आहे, या योजनेसाठी पुढील पाच वर्षांची तरतूद करून ठेवली आहे. जर पुन्हा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली तर पुढील अर्थसंकल्प हा सात हजार कोटींचा असेल त्यात लाडक्या बहिणींसाठी 45 हजार कोंटींची तरतूद असेल असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.