महिलांना आर्थिकदृष्या सक्षम करण्यासाठी महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. अंतरिम अर्थसंकल्पामध्ये या योजनेला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर जुलैपासून या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येत आहेत. नोव्हेंबरपर्यंतचे पैसे महिलांना मिळाले आहेत. आता डिसेंबर महिन्याचे पैेसे कधी जमा होणार याची सर्वांना प्रतीक्षा आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण ही योजना प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनला होता.
या योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या पैशांवरून प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. मात्र दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी देखील विरोधकांना तोडीस तोड प्रत्युत्तर दिल्यानं या योजनेवरून विधानसभा निवडणूक काळात वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर महायुतीचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. तर दुसरीकडे आमचं सरकार आलं तर आम्ही महिलांना तीन हजार रुपये देऊ अशी घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती.
दरम्यान पुन्हा राज्यात महायुतीचं सरकार आलं तर ही योजना बंद पडेल, निवडणुकीसाठीच ही योजना सुरू करण्यात आली असा आरोप देखील महाविकास आघाडीकडून करण्यात आला होता, याला आता पुन्हा एकदा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. लाडकी बहीण ही योजना सुरूच राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
ते पुढे बोलताना म्हणाले की, ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांच्यावर आहे, अशा लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार नाही. लाडक्या बहीण योजनेत कर भरणाऱ्या महिलांचा अर्ज अपेक्षित नाहीये. लाडक्या बहीण योजनेसाठी जे आधीचे निकष आहेत, तेच कायम राहणार आहेत. दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांच्या या वक्तव्यानंतर आता ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखांच्या वर आहे किंवा ज्या महिला कर भरतात मात्र तरी देखील त्यांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे, त्यांचे अर्ज बाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.