ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. गेल्या वर्षी जुलैपासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. डिसेंबर महिन्यापर्यंतचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आहेत, आता सर्वाचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे जानेवारीचा हप्ता कधी मिळणार आणि किती मिळणार? म्हणजे खात्यात 1500 रुपये जमा होणार की 2100 रुपये जमा होणार याकडे.
आमचं सरकार पुन्हा सत्तेत आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये करण्यात आली होती. दरम्यान आता पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार आलं आहे. महायुतीचं सरकार स्थापन होण्यामध्ये लाडक्या बहिणींची भूमिका मोठी होती अशी देखील चर्चा आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
तसंच आणखी एक महत्त्वाचं म्हणजे, लाडकी बहीण या योजनामुळे सरकारच्या इतर योजना प्रभावित होत असल्याची देखील चर्चा आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या पैशांवर मर्यादा येणार असल्याच्या बातम्या देखील मध्यंतरी समोर आल्या होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर मंत्री आदिती तटकरे यांनी आता मोठा खुलासा केला आहे. आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट दिली आहे.
नेमकं काय म्हणाल्या आदिती तटकरे?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हफ्ता 25 डिसेंबरला लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. आता जानेवारीचे पैसे 26 जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होतील. येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये लाभार्थी महिलांना लाभ मिळण्यास सुरु होईल, ही योजना सुरूच राहणार असून, दर महिन्याला हा लाभ लाभार्थी महिलांना मिळत राहील असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान 2100 रुपये कधिपासून मिळणार यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आधीसुद्धा बऱ्याचवेळा स्पष्टीकरण दिले आहे, नवीन अर्थसंकल्प व त्यापुढील काळात हा विचार केला जाईल. या महिन्यात 1500 रुपयांचाच लाभ दिला जाईल त्यासाठी 3 हजार 690 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, असं तटकरे यांनी म्हटलं आहे.