ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं लाडकी बहिण योजना सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये सहा हाप्ते जमा करण्यात आले आहेत. दर महिन्याला महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. आमचं सरकार पुन्हा आलं तर आम्ही महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा करू अशी घोषणा महायुतीकडून करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार आलं आहे, त्यामुळे 2100 रुपये कधीपासून जमा होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. मात्र त्याचपूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे.
ज्या महिला योजनेच्या निकषात बसत नाही, त्यांची जर तक्रार आली तर त्यांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी होणार असं या आधीच मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी असं सांगितलं, की ज्या महिलांचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, ज्या महिलांकडे चार चाकी गाडी आहे. ज्या महिलांचं आधार कार्डला वेगळं नाव आणि बँकेंच्या खात्यात वेगळं नाव आहे, अशा महिलांबाबत तक्रार आली तर त्यांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी करण्यात येईल, मात्र जीआरमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
परंतु आज राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेवर दिलेल्या प्रतिक्रियेनंतर ज्या महिला या योजनेच्या लाभासाठी पात्र नाही अशा महिलांकडून दंडासहित पैसे वसूल केले जाणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नेमकं काय म्हणाले भुजबळ?
गरीबांना या योजनेचा लाभ झाला पाहिजे हाच या योजनेचा उद्देश आहे. मात्र हेही खरं आहे, या योजनेचे काही नियम आहेत. ज्यामध्ये एका घरात दोन महिलांना पैसे देता येत नाहीत, मोटार गाडी असेल तर त्यांना पैसे देता येणार नाहीत. गरीबांना त्याचा लाभ झाला पाहिजे हा या योजनेचा उद्देश आहे. ज्या महिला नियमात बसत नाहीत, त्यांनी स्वतःहून आपली नावे काढली पाहिजेत. जे पैसे दिले गेले आता ते परत मागण्यात काही अर्थ नाही ते आता मागण्यात येवू नयेत, याच्यापुढे लोकांना सांगावं, जे नियमात नाही त्यांनी स्वतःहून नावे काढून घ्यावेत. त्यांनी जर तसं नाही केलं तर मग मात्र दंडासह पैशांची वसुली करावी, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.