लातूर : लातूर अन् पाणी टंचाई जसे काही जोडून येणारेच शब्द आहेत. बरं परस्थितीही तशीच लागून राहिलीयं की. मांजरा धरण ओव्हर फ्लो झाले काय आणि त्याने तळ गाठला काय? लातुरकरांची (Shortage of water) पाणी टंचाई ही ठरलेलीच आहे. पण आतापर्यंत जे राज्यकर्त्यांना जमले नाही ते (Administration) प्रशासनाने करुन दाखवलं आहे. सध्या मनपावर प्रशासकाची नेमणूक आहे. असे असताना आता (Latur) लातूर शहरवासीयांना आठवड्यातून दोनदा पाणी पुरवठा केला जाणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून आठ दिवसातून एकदा असाच काय तो पाणी पुरवठा. पण आता दोन वेळा पाणीपुरवठ्याला सुरवात देखील झाली आहे. त्यामुळे लातुरकरांची पाणी साठवणुकीची चिंता काही प्रमाणात का होईना मिटली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून आठवड्यातून किमान दोन वेळा तरी पाणीपुरवठा व्हावा म्हणून प्रयत्न केले जात होते. पण ते शक्य झाले नाही. आता दोन वेळा पाणी पुरवठा कऱण्यासाठी महापालिकेने 52 किलो मिटरची नवीन पाईपलाईन टाकली आहे. एवढेच नाही तर त्यासाठी 750 ठिकाणी क्रॉस कनेक्शन करण्याची नामुष्की ओढावली आहे. एवढे सर्व करुन 150 पेक्षा जास्त ठिकाणी व्हॉल्व बसविण्यात आले आहेत. महापालिकेच्या या अथक परिश्रमामुळे आता लातुरकरांना आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा सुरु झाला आहे.
लातूर शहराला पाणीपुरवठा करणारे मांजरा धरण हे उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवर वसले आहे. या धरणावरून आंबाजोगाई, धारुर, केज, कळंब आणि लातूर शहरासह येथील एमआयाडीसीला पाणीपुरवठा केला जातो. लातूर जिल्ह्यात पाण्याचा शाश्वत स्त्रोत नसल्याने ही नामुष्की ओढावली आहे. आतापर्यंत आठवड्यातून एकदाच पाणी हे ठरलेले होते. पण मनपाच्या या प्रयोगामुळे आठवड्यातून किमान दोन वेळा पाणीपुरवठ्याला प्रत्यक्षात सुरवात झाली आहे.
पालिका प्रशासनाने वेळ आणि अधिकचा पैसा खर्च करुन लातुरकरांना आठवड्यातून किमान दोन वेळा पाणी कसे मिळेल याचा विचार केला होता. त्यानुसार यंत्रणेत बदल करावा लागला आहे. गेल्या अनेक दिवसापासूनची मेहनत कामी आली असून आता अशाप्रकारे पुरवठा नियमित केला जाणार आहे. असे असले तरी नागरिकांनी पाण्याचा अपव्यय करु नये असे आवाहन मनपा आयुक्त अमन मित्तल यांनी केले आहे.