उस्मानाबाद : जिल्ह्याला प्राचीन असा वारसा लाभला आहे. उस्मानाबादपासून (Osmanabad) पश्चिमेला 5 किमी अंतरावर बालाघाट डोंगर रांगेत इ. स. सहावे ते आठव्या शतकातील उत्तर वाकाटक काळातील लेणी आहेत. हा सात लेणींचा लेणी (Leni) समूह आहे. येथील लेणी क्रमांक दोन ( पार्श्वनाथ भगवान ) मुख्य अशा लेणीजवळ पाण्याचे कुंड आहे. येथे इतिहास व पुरातत्व अभ्यासक जयराज खोचरे यांना संशोधन करत असता त्यांना प्राचीन काळातील दोन जाते सापडले. लेणीमध्ये वास्तव्य करणारे साधक अथवा भिकू हे भिक्षा मागून उदर निर्वाह करत असत. काही अनुयायांनी व धर्म दीक्षा देणाऱ्या लोकांनी दिलेली मदत व धान्य हे दळण्यासाठी या जात्यांचा उपयोग होत असावा.
पाण्याच्या कुंडाजवळ हे जाते मिळाले. त्यामुळं या ठिकाणी अन्न बनवण्याची जागा असावी. जात्याचे लहान मोठे आकार यावर आपण असे सांगू शकतो की, व्यक्तिगत अन्न बनविले जात असावे. काही वेळा सामूहिक अन्न दळले जात असावे. याच भागात एखादी प्राचीन वसाहती असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुरातत्व खाते यांनी या ठिकाणी उत्खनन करावे, अशी मागणी जयराज खोचरे यांनी केली. उत्खनन केल्यास जमिनीच्या पोटात काय आहे, ते दिसेल. यावरून या भागात प्राचिन वसाहत होती का याची खात्री होईल.
धाराशिव लेण्यांचा उल्लेख प्राचीन जैन साहित्यात येतो. 11 व्या शतकातील जैन मुनी कनकामर यांच्या करकण्डचरयु या प्राकृत ग्रंथात लेण्यांबद्दलचा उल्लेख आहे. या ग्रंथानुसार करकंड नावाच्या राजाचा मुक्काम तेरापूरच्या दक्षिणेस असलेल्या अरण्यात पडला होता. तेव्हा तेरापूरच्या शिव नावाच्या राजाने त्याची भेट घेतली. जवळच असलेल्या लेण्यांसंबंधी माहिती सांगितली. या लेण्यांमध्ये अनेक स्तंभ आहेत. त्यात पार्श्वनाथाच्या मूर्तीची करंडक राजाने पूजा केली. त्याचबरोबर या लेण्यांचा त्याने जीर्णोद्धार केला. तेथील डोंगर माथ्यावर त्याला वारुळात असलेली एक पार्श्वनाथाची मूर्ती सापडली होती.
इतर बातम्या :