लातूर : गेल्या 30 दिवसांपासून (Latur) लातुरात गढूळ आणि पिवळसर रंगाच्या पाण्याची चर्चा सुरु होती. तब्बल महिनाभर गढूळ (Water Supply) पाणीपुरवठ्याचे नेमके कारण काय हे शोधण्यात (Latur Muncipal) मनपा प्रशासनाची दमछाक झाली होती. अखेर शनिवारी लातुरकरांना शुध्द पाण्याचा पुरवठा झालेला आहे. विशेष म्हणजे लातुरकरांच्या नळाला पाणी सोडण्यापूर्वी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी हे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही यासाठी पाणी पिऊन दाखवले. गढूळ पाण्याबरोबर येथील राजकारणही चांगलेच ढवळून निघाले होते. अखेर याला पूर्णविराम मिळाला असून शनिवारी सकाळी शहरातील काही भागात झालेला पाणीपुरवठा हा स्वच्छ असल्याचे दिसून आले.दरम्यानच्या काळात नागरिकांच्या तक्रारी आणि विरोधकांकडून टिकास्त्र यामुळे मनपा प्रशासनाची झोप उडाली होती.
गढूळ आणि पिवळसर पाण्याचे नेमके कारण काय आहे हे शोधून काढण्यासाठी पाईपलाईद्वारे जो पाणीपुरवठा होता तो बंद करण्यात आला होता. शिवाय मांजरा धरणावरील वरचे गेटही उघडण्य़ात आले होते. त्यानंतरच गढूळ पाण्याचे नेमके कारण काय हे समोर आले होते. आता देखील नळाला पाणी सोडल्यानंतर पहिले 20 मिनिट हे पिवळसर पाणी राहणारच आहे. त्यानंतर मात्र, शुध्द पाण्याचा पुरवठा होणार आहे. त्याअनुशंगाने काही दिवस अधिकचा काळ पाणी सोडले जाणार असल्याचा निर्णय झाल्याचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितले आहे.
शहरातील नागरिकांना तब्बल 30 दिवस पिवळसर पाणी पुरवठा होतोय हा मुद्दा घेऊन विरोधकांना सत्ताधारी कॉंग्रेसला चांगलेच धारेवर धरले होते. केवळ निषेधच व्यक्त नाही तर पिवळे पाणी घेऊन थेट मनपामध्ये भाजपा पदाधिकारी दाखल झाले होते. तर दुसरीकडे नेमकी समस्या काय आहे याचा उलगडा मनपा प्रशासनाला झाला नव्हता. ऐन मनपा निवडणुकीच्या तोंडावर हा पाण्याचा मुद्दा विरोधकांना मिळाल्याने निवडणुकीची चाहूल लागल्याची जाणीव लातुरकरांना झाली हे मात्र नक्की.
गेल्या महिन्याभरापासून लातुरकरांना गढूळ पाणी पुरवठा होत होता. आगामी काळातही नळाला पाणी सोडल्यापासून 15 ते 20 मिनिट काही प्रमाणात का होईना गढूळ पाणीच येणार त्यामुळे पुढील काही दिवस अधिकचा वेळ पाणीपुरवठा केला जाणार आहे. दरम्यानच्या काळात लातूरकरांना बोअरच्या पाण्यावर तहान भागवावी लागली होती. त्यामुळे वाढीव वेळेमुळे अधिकच्या पाण्याचा साठा करता येणार आहे.