2047 ला सशक्त भारत बनवायचा असेल तर महिला केंद्रीत योजना कराव्या लागतील. तसे झाल्यावरच आपण सशक्त भारत बनवू शकतो. त्यामुळे आम्ही लखपती दिदी, लाडकी बहीण योजना, पन्नास टक्के एसटी प्रवास या योजना आणल्या. मात्र लाडकी बहीण योजना बंद कारण्यासाठी कोर्टात गेलेला व्यक्ती हा काँग्रेसचा आहे. काँग्रेसचे नाना पटोले यांचा निवडणूक प्रचार प्रमुख आहेत हे दुर्दैव आहे. माझी विरोधकांना विनंती आहे की बिचाऱ्या महिलांच्या योजना बंद करू नका, त्याला विरोध करू नका, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
लातूरमधील उदगीरमध्ये बौद्ध विहाराचं राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना फडणवीसांनी हे विधान केलं आहे. नाना पटोलेंचं नाव घेत फडणवीसांनी टोला लगावला आहे.
भव्य बौद्धविहाराचे उदघाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झाले. अतिशय सुंदर आणि शांतता देणारी वास्तू उभी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुध्दांचा धम्म सर्वसामान्य लोकांमध्ये नेला. संविधानात गौतम बुध्दांचे विचार आणले आणि उत्तम संविधान निर्माण केले. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत भारताचे संविधान बदलू शकत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
उदगीरमधील याच कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं. लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहिल्यावर लक्षात आले की लाडकी बहीण योजना योग्य आहे. लाडकी बहीण योजनेविरोधात काँग्रेसचा कार्यकर्ता कोर्टात गेला. लेक लाडकी योजनेतून 18 व्या वर्षी 1 लाख जमा होणार आहे. या योजनामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. मात्र कितीही विरोध झाला तरी योजना बंद होणार नाही. हे देणारे सरकार आहे घेणारे नाही. आता दर महिन्याला बहिणीच्या खात्यात पैसे जमा होतील. लाडकी बहीण योजनेची मुदत सप्टेंबर पर्यंत वाढवली आहे, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.