उस्मानाबादः तुळजापूर मंदिरात (Tuljapur Temple) छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje) यांना गाभाऱ्यात सोडण्यास मनाई केल्याचे प्रकरण चांगलेच तापले आहे. काल या प्रकरणी तुळजापूरकरांनी कडकडीत बंद पाळल्यानंतर आज उपजिल्हाधिकाऱ्यांकडून दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिरात छत्रपती संभाजीराजे यांचा अवमान केल्या प्रकरणी मंदिर तहसीलदार (Tahsildar) योगिता कोल्हे व सहायक धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. प्रशासकीय कारवाई का करण्यात येऊ नये ? असे नोटीसीत नमूद असून सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी अविनाश कारडे यांनी ही नोटीस काढली आहे. प्रशासकीय कारवाई का करण्यात येऊ नये याबाबत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. संभाजीराजे परिवाराची तुळजापूर मंदिरात दर्शनासाठी येण्याची शेकडो वर्षांपासूनची परंपरा आहे. मात्र यावेळीच त्यांना गाभाऱ्यात जाण्यापासून अडवण्यात आल्याने नागरिकांमधून तसेच संभाजीराजेंच्या कार्यकर्त्यांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. हे प्रकरण आता अधिकाऱ्यांना चांगलेच महागात पडणार असं दिसतंय.
सोमवारी 09 मे रोजी छत्रपती संभाजीराजे हे तुळजापूरात आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी दाखल झाले होतेय. गाभाऱ्यात जाऊन आरती करण्याची या घराण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. मात्र यावेळी संभाजीराजेंना थेट गाभाऱ्यात प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे तुळजापुरातील मातेच्या दर्शनासाठी आल्यावर संभाजीराजेंना विधिवत दर्शन घेता आले नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश बंदी केली आहे. त्यामुळे इतर भाविकांप्रमाणे छत्रपती संभाजीराजेंनाही अडवण्यात आलं. विशेष म्हणजे स्वतः जिल्हाधिकारी यांना संभाजीराजेंनी फोनही केला होता. तरीही त्यांना आत सोडण्यात आलं नाही. त्यामुळे शेकडो वर्षांची परंपरा मोडल्यानं संभाजीराजेंनी नाराजी व्यक्त केली.
संभाजीराजेंना मिळालेल्या अशा प्रकारच्या वागणुकीमुले सकल मराठा समाज आणि तुळजापूरकरांनी गुरुवारी कडकडीत बंद पाळला. संपूर्ण तुळजापूर काल बंद ठेवण्यात आलं. या प्रकाराबद्दल तुळजापूर देवस्थानने दिलगिरी व्यक्त केली आहे. तरीही नागरिक जिल्हाधिकारी यांच्यावर कारवाईच्या मागणीवर ठाम होते. मुजोर प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली. आज या प्रकरणी संबंधित तहसीलदार आणि धार्मिक व्यवस्थापकांना नोटीस बजावण्यात आली आहे.
संभाजीराजे अवमान प्रकरणी कार्यकर्ते आक्रमक झाले असून तहसीलदार, धार्मिक व्यवस्थापकांना तत्काळ निलंबित करा, या मागणीवर ते ठाम आहेत. तसेच जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावर यांना हटवण्याचीही मागणी केली जात आहे. सध्या तरी या प्रकरणी दोघांना उपजिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे.