महेंद्र जोंधळे, प्रतिनिधी, लातूर : ही कहाणी आहे सृष्टी जगताप नावाच्या विद्यार्थिनीची.ती सध्या अकराव्या वर्गात शिकते. सृष्टीचे आईवडील दोघेही शिक्षक आहेत. त्यामुळे त्यांनी सृष्टीला तिच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी दिली. सृष्टीने यापूर्वी सलग २४ तास नृत्य करत लातूरमध्ये विक्रम केला. आता तर तिने तब्बल पाच दिवस म्हणजे १२६ तास नृत्य करत जागतिक विक्रम केला. त्यामुळे सृष्टीचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे. नृत्यात विक्रम केला असला, तरी तिला भविष्यात जिल्हाधिकारी पदापर्यंतची मजल मारायची आहे. त्यासाठी तिला आणखी परिश्रम करावे लागतील. त्यात ती नक्कीच यशस्वी होईल, अशा आशा बाळगायला काही हरकत नाही.
लातूरच्या सृष्टी जगताप या 17 वर्षीय मुलीने सलग 126 तास नृत्य सादर करून नवा विश्वविक्रम केला आहे. या विश्व विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. लातूरच्या दयानंद सभागृहात सृष्टी जगताप ही सलग 126 तास म्हणजे गेली पाच दिवस पाच रात्री सलग नृत्य करीत होती. मोठे परिश्रम आणि अद्वितीय जिद्दीच्या जोरावर तिने हे वर्ल्ड रेकॉर्ड केले आहे.
सृष्टी जगताप ही लातूरच्या दयानंद महाविद्यालयात इयत्ता अकरावीमध्ये शिकते आहे. तिचे आई संजीवनी आणि वडील सुधीर जगताप हे दोघेही शिक्षक आहेत. सृष्टी जगतापला भविष्यात जिल्हाधिकारीसारख्या पदावर जायची इच्छा आहे. तिने या अगोदर सलग 24 तास नृत्य सादर करीत लातूरमध्येच विक्रम केला होता.
सृष्टीच्या त्या विक्रमाची नोंद अशिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये झालेली आहे. सलग 126 तास नृत्य सादर केल्याचे रेकॉर्ड नेपाळच्या एका कलावंताच्या नावावर होते. आता हे रेकॉर्ड सृष्टी जगतापच्या रूपाने पुन्हा भारताच्या नावावर झाले आहे.