लातूर : केवळ 500 रुपयांसाठी एका तरुणास अत्यंत निर्दयीपणे हाल करुन ठार केल्याची चार वर्षापूर्वी लातूर शहरात घडली होती.घटनेच्या 4 वर्षानंतर याबाबत (Latur District and Sessions Court) लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाने याप्रकरणातील सर्वच्या सर्व आठ आरोपींना (Life sentence) जन्मठेपीची शिक्षा सुनावली आहे. यामध्ये सात पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. (Latur Crime) शादुल शेख रा. अंजलीनगर या तरुणाचा शहरातीलच टाऊन हॉल मैदानावर आईस गोळ्याचा गाडा होता. एप्रिल 2018 मध्ये गाडा लावला असताना आरोपींनी त्याला 500 रुपायांची मागणी केली होती पण शादुल ही रक्कम देण्यास विरोध दर्शवला होता. याचाच राग मनात धरुन आरोपींनी त्यास मारहाण केली होती. यामध्ये त्याचे हाल करुन अत्यंत निर्दयीपणे त्याची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी तब्बल आठ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोर्टाचे हे आदेश येताच आरोपींच्या नातेवाईकांनी आक्रोश केला होता.
शादुल शेख आणि या घटनेतील आरोपी यांची घटना घडण्यापूर्वीही वाद झाले होते. मात्र, त्याने 500 रुपये देण्यास नकार दिल्याने आरोपी अन्वर सय्यद याने त्याला सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घरी बोलावून घेतले होते. दरम्यान, सय्यदच्या घरातील एका पत्रा खोलीमध्ये शादुल यास उलटे डांबून मारहाण करण्यात आली होती. एवढेच नाही तर यातील सर्व आरोपींनी त्याच्या नाका-तोंडात चटणीची पूड टाकली होती. दारुच्या नशेत असलेल्या आरोपी हाजीअली दस्तगीर शेख याने तर शादुलच्या आईला फोन करुन तुझ्या मुलाला मारहाण करीत आहोत. हा सीन पाहयाला आणि मुलाला वाचवायला ये म्हणून फोनही केला होता. त्यामुळे मयत शादुलची आई घटनास्थळी दाखलही झाली होती. मात्र, या आठ आरोपींसमोर तिचा नाईलाज झाला.
या प्रकरणात महिला आरोपी असणाऱ्या अन्वर सय्यद याची पत्नी शन्नू हीने स्वत:च्या मोबाईलवर या सर्व मारहाणीचा व्हिडीओ केला होता. एवढ्या अमानुषपणे मारहाण होत असताना आठपैकी एकालाही शादुलवर दया आली नाही. सकाळी 11 वाजता सुरु झालेली मारहाण ही दुपारी 3 पर्यंत सुरु असल्याचे वकीलांनी सांगितले आहे. शिवाय घटनेच्या दिवशी दुपारी 4 वाजता शादुल याचा मृत्यू झाला होता. नातेवाईकांनी त्यास जिल्हा रुग्णालयात आणले असता मृत घोषित केले होते.
सदरील घटनेच्या निकाला दरम्यान, गुरुवारी प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.व्ही. गुजराथी यांनी सर्व आरोपींना दोषी ठरवत कलम 302 नुसार जन्मठेपीची शिक्षा सुनावली. यामध्ये हाजीअली दस्तगीर शेख, युसुफ फारुख शेख, जब्बार सत्तार सय्यद, शन्नू अन्वर सय्यद, अन्वर दस्तगीर सय्यद, दौलत बाबुमिया शेख, सलीम नजीर सय्यद व बाळू पंडीत सुर्यवंशी सर्व राहणार लातूर यांचा समावेश आहे. गुरुवारी या प्रकरणी सर्वच आरोपींना जन्मठेपीची शिक्षा होताच कोर्टात असणाऱ्या आरोपींच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. अखेर घटनेच्या 4 वर्षानंतर या प्रकरणी निकाल लागला असून सरकारी वकील म्हणून अॅड. संतोष देशपांडे यांनी काम पाहिले.
बिबट्याने घेतला 16 वर्षीय मुलाचा घास, चंद्रपूर शहरालगतच्या दुर्गापुरात रात्री नेमकं काय घडलं?