मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेली काही वर्षे आंदोलन सुरु असतानाच आता ओबीसी समाजानेही आक्रमक होत उपोषण सुरु केले आहे. ज्या मराठवाड्याच्या जालनातून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाची सुरुवात केली आणि सरकारला धारेवर धरले त्याच जालनातील वडीगोद्री येथे ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे उपोषणाला बसले आहेत. या उपोषणस्थळावर जाऊन विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना उपोषण सोडू नका पण निदान पाणी तरी प्या अशी विनंती करीत पाणी पाजले. त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. यावेळी त्यांनी घटनास्थळावरुन व्यासपीठावरुनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला आणि उपोषणस्थळाला भेट देण्याची विनंती केली.
गेले अनेक दिवस ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे उपोषण सुरु आहे. त्यामुळे मराठा आंदोलनाला काऊंटर करण्यासाठी आता ओबीसी नेतेही आक्रमक झाले आहेत. या उपोषणस्थळावर नुकतेच भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील भेट दिली होती. आज विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील उपोषण स्थळाला भेट देऊन लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी तब्यतेची काळजी घ्या… ओबीसी आरक्षणाला कुठंही धक्का लागणार नाही असे आश्वस्थ केले. यावेळी त्यांनी व्यासपीठावरुनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला. सरकारचे शिष्टमंडळ उद्या उपोषण स्थळी पाठविणार असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.
सत्ता आणि पद येत असते जात असते. मी समाजासाठी आहे. सत्तेसाठी नाही. मी मंत्रिपद सोडून समाजासोबत राहिलो. राजकारण्यांनी समाजाला भडकवण्याचा काम केले आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आमचं आरक्षण जाईल अशी भीती सर्वांना वाटत असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले. ‘सगे सोयरे’ संदर्भात गिरीश महाजन यांनी हे आरक्षण न्यायालयात टिकणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आमच्या वाट्याचे आरक्षण का काढून घेताय याचे उत्तर सरकारने द्यावे. दोन समाज एकमेकांचे वैरी होत आहेत. समाजाचे व्यवहार बंद होत आहेत. समाजाची फसवणूक झाली नसती तर ही वेळ आली नसती. दिवसेंदिवस जनतेचा उद्रेक होत आहे. मुख्यमंत्र्यांनी निर्णय लवकर घ्यावा अशी विनंती विजय वडेट्टीवार यांनी केली.
संघर्ष हा आमच्या पाचवीला पुजलेला आहे. राजकारणात असून देखील आम्हाला तोंड दाबून मुक्क्याचा मार सहन करावा लागतोय.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आम्हाला अधिकार मिळाले आहेत. मात्र आमचे अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
माझ्यासोबत काम करणारे हे दोघे जीवावर बेतून आमरण उपोषण करीत आहेत. यांचा त्याग ओबीसी समाजाला एकत्रित होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. उद्या सरकारचे शिष्ठमंडळ उपोषणस्थळावर येणार आहे. त्यांच्याकडून लेखी आश्वासन घ्या असाही उपदेश विजय वडेट्टीवार यांनी दिला. उद्या आपण परत उपोषणस्थळी येणार असल्याचेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
डोक्यात असलेली आग आम्ही मांडू. या आंदोलनाला राजकीय स्वरूप आणू नका. धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण देऊ असे म्हणून 2014 साली हे सरकार सत्तेत आले. दोन समाजाला झुलविण्याचे काम या सरकारने केले आहे. प्रकाश आंबेडकर जे बोलले ते सत्य आहे. ओबीसी आणि मराठा समाजाचे ताट वेगळे असावे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले ते खरे आहे. याबाबत खोलवर अभ्यास करून सरकारने निर्णय घ्या. वरवरचा निर्णय घेवू नये. 12 बलुतेदार यांचा व्यवसाय हिरावला गेला आहे. तत्पूर्वी उपोषणकर्त्यांना त्यांनी उपोषणकर्त्यांना विनवणी केली की तुम्ही उपोषण सोडू नका, मात्र माझ्या हातून दोन घोट पाणी प्या. विजय वड्डेट्टीवर यांनी विनंती केल्यानंतर उपोषणकरत्यानी पाणी घेतलं.