मुंबई : 3 सप्टेंबर 2023 | जालना येथील मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज नंतर राज्यातील वातावरण तापले आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, छत्रपती संभाजी, खासदार उदयनराजे भोसले आदि नेत्यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेतली. नेते आले आणि आश्वासन देऊन गेले. पण, आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. आंदोलनाचा भडका आज सलग दुसऱ्या दिवशीही कायम होता. मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे तीव्र पडसाद मुंबईसह अन्य जिल्ह्यातही उमटले आहेत.
मुंबईमध्ये दादर येथील प्लाझा सिनेमाबाहेर मराठा मोर्चाचे आंदोलन झाले. यावेळी इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम, दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले होते. मुख्यमंत्री शासन आपल्या दारी कार्यक्रम करतात कायदा हातात घेऊ नका म्हणतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा समाजाचे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे देखील मराठा समाजाचे. मात्र, मराठा समाजाला न्याय मिळत नाही. आरक्षण मिळत नाही, अशी टीका आंदोलकांनी केली.
सोलापूरच्या माढा येथे मराठा समाजाने आज रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करुन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर, मराठा समाजातील लहान शालेय मुलांच्या हस्ते तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर परिसरात नांदेड हिंगोली महामार्गावर आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. या दरम्यान आंदोलकांनी एका ॲम्बुलन्सला वाट मोकळी करून देत माणुसकीचे दर्शन घडविले.
– जालना बसस्थानकात आज शुकशूकाट असून येथून एकही बस सुटली नाही.
– संपूर्ण मराठवाड्यात बस सेवा आज बंद
– बार्शी तालुक्यातील पानगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
– मराठा संघटनांकडून आज नाशिक बंदची हाक देण्यात आली. त्यामुळे येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
– ठाण्यातील माजीवाडा पुलावर टायर जाळण्यात आले. यामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
– सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील आमणापूर गावात बंद पुकारण्यात आला.
– नाशिकच्या चांदवड येथे हिंदू समाजाने गोवंश हत्या, लव्ह जिहाद, लँड जिहाद, धर्मांतरण कायदा तात्काळ लागू करण्याची मागणी करत मोर्चाला पाठिंबा दिला.
– अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरासह तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.
– पंढरपूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील सर्व मुख्य रस्ते, बाजारपेठ बंद आहेत. रविवार असल्यामुळे विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. पण, बंदमुळे त्यांची तारांबळ उडाली.