संभाजीनगर : 16 ऑगस्ट 2023 । राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अत्यंत जवळच्या सहकाऱ्यांनी अनेक वर्षाची साथ सोडली. शरद पवार यांचा पुतण्या अजित पवार यांनी शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांना प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ यांच्यासारख्या नेत्यांनी पाठिंबा दिला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत जे घडले त्याचीच ही दुसरी पुनरावृत्ती होती. शिवसेना काय किंवा राष्ट्रवादी काय हे दोन्ही पक्ष फोडण्यामागे भाजप पक्षाचा हात असल्याचे बोलले जाते. मात्र, पक्ष फुटीनंतर शरद पवार यांनी आज संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत बोलताना देशात एका नव्या ‘पावनशक्ती’चा जन्म झाल्याची टीका केलीय.
केंद्रीय निवडणूक आयोगाने मला नोटीस दिली. निवडणूक चिन्हाबाबत मी काही प्रश्न उपस्थित केले. त्याबाबत उत्तर देण्यासाठी मला नोटीस दिली. शिवसेनेबाबत काही शक्तीशाली लोकांनी जे केले तोच प्रयोग आमच्याबाबतीत होत आहे, असे मला वाटते असे पवार म्हणाले.
राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत मी काही विचार करत नाही. 14 चिन्हांवर मी निवडणूक लढली आहे. त्यात बैल, गाय वासरू, चरखा, घड्याळ या चिन्हांवर लढलो. चिन्ह बदलूनसुद्धा मी निवडून आलो. त्यामुळे मला चिन्हाची भीती नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या चाळीस आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले होते. त्यावेळी त्यांनी सोबत गेलेल्या आमदारांशी बोलताना आपल्यामागे एक महाशक्ती असल्याचा उल्लेख केला होता. तोच धागा पकडून पवार पुढे म्हणाले, आमचे काही सहकारी गेले. त्यापैकी काही लोक मला भेटले आणि त्यांनी एक नवीन माहिती मला दिली.
आजपर्यंत देशामध्ये राजकीय निर्णय हे राजकीय पक्ष, राजकीय नेते घेतात असे मला वाटत होते. पण, माझे काही सहकारी त्यांचा निर्णय घेण्याआधी मला भेटले. त्यांच्याकडून मला एक नवीन कळले की, राजकीय पक्ष किंवा राजकीय नेते निर्णय घेतात. त्याहीपेक्षा देशात पावनशक्ती आहे. त्या पावनशक्तीचे नाव ईडी आहे. ती ईडीच आता राजकीय पक्षाचे निर्णय घेतात असं आता दिसायला लागलं आहे. त्यांनी कुणाच्या बाबतीत कधी निर्णय घेतले हे मला माहिती नाही, अशी टीका शरद पवार यांनी यावेळी केली.