महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महायुतीच्या तीनही घटकपक्षांकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. तीनही पक्षांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये भाजपकडून 99, शिंदे गटाकडून 45 तर अजित पवार गटाकडून 38 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. महायुती पाठोपाठ आता महाविकास आघाडीतही घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार गटातील अनेक नेते शरद पवारांच्या भेटीगाठी घेत आहेत. तर दुसरीकडे ठाकरे गटातही भेटीगाठींचा सिलसिला सुरु आहे. विशेष म्हणजे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून अनेक जणांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एबी फॉर्म देण्यात आले आहेत. यापैकी ज्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज मिळाले आहेत, त्यांची नावे ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागले आहेत.
दरम्यान, काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेळके यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी जयश्री शेळके यांनी उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. विशेष म्हणजे जयश्री शेळके यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देखील देण्यात येत आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून जयश्री शेळके यांना उमेदवारी देण्यात येत आहे. विशेष म्हणजे त्यांनादेखील आज एबी फॉर्म देण्यात आल्याची माहिती आहे.
अंबरनाथमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून राजेश वानखेडे यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. त्यामुळे अंबरनाथमध्ये शिवसेना शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट यांच्यात लढत होणार असल्याचं निश्चित आहे. पण तरीहीदेखील शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांची उमेदवारी अद्याप घोषित करण्यात आलेली नाही. शिंदे गटाने काल जाहीर केलेल्या यादीत बालाजी किणीकर यांचं नाव नव्हतं.