परळी : परळी शहराची (Parali city) स्थिती सध्या धरण उशाला कोरड घशाला अशी स्थिती झाली आहे. थर्मल पॉवर स्टेशन असणाऱ्या ठिकाणी लोडशेडिंग (Loadshading) होत नसेल, असे सर्वांना वाटत असेल. मात्र परळीत रात्री अपरात्री, सकाळ, दुपार, संध्याकाळ केव्हाही लाईट जात आहेत. कडक उन्हाळ्यात लोकांना उष्णता आणि गर्मीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यात पिण्याचे पाणी (Water) तब्बल पाच दिवसाला एकदा येते. त्यातही त्या वेळेत लाईट नसल्यास नागरिकांना पाणीदेखील भरता येत नाही. महावितरणच्या अशा प्रकारे अघोषित लोडशेडिंगमुळे नागरिक त्रस्त आहेत. आज नागरिकांच्या वतीने भाजपच्या युवा मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आलं.
थर्मल पॉवर स्टेशन असलेल्या परळीत सध्या अवेळी लाईट जाण्याचे प्रकार वाढले आहेत. महावितरणने लोडशेडिंगसाठी कोणतेही वेळापत्रक घोषित केलेले नाही. दिवसा-रात्री कधीही लोडशेडिंग करतात. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागत आहे. याविरोधात आज भाजपच्या युवा मोर्चाच्या वतीने प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पंख्याला तिरडीवर चढवून त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली. शहरातील वीज भार नियमानावर लवकरच तोडगा काढला नाही तर भाजपातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल.
दरम्यान, राज्यात कोळसा संकट निर्माण झाल्याने भारनियमनाचा निर्णय घ्यावा लागणार असल्याची माहिती काल ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली. राज्यात पुढील दोन दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा शिल्लक असून उष्णतेमुळे वीजेची मागणीदेखील वाढल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत केंद्र सरकारशी बोलणे सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.
इतर बातम्या-