मुंबई : देशात लोकसभा निवडणूकांचा माहोल सुरु आहे. केंद्रात सलग दोन वेळा सत्ता मिळविणाऱ्या भाजपाप्रणीत एनडीए आघाडीने ‘अब की बार, 400 पार’चा नारा देत पुन्हा एकदा दिल्ली काबीज करण्याचा निर्धार केलाय. एनडीए आघाडीने प्रचाराचा धुमधडाका लावला आहे. देशातील विविध राज्यात लोकसभा निवडणूक मतदानाचे दोन टप्पे पार पडले आहेत. येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. त्यानंतर चौथ्या टप्प्याचे मतदान 13 मे तर पाचव्या टप्प्याचे मतदान येत्या 20 मे रोजी पार पडणार आहे. पाचव्या टप्प्यात देशाची आर्थिक राजधानी मुंबईत मतदान होणार आहे. मुंबईमध्ये सहा लोकसभा मतदार संघ आहेत. येथे शिवसेनेतून बंडखोरी करुन बाहेर पडलेले आणि पक्ष बळकावलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जोरदार टक्कर होणार आहे. या मतदार संघातील काय आहे परिस्थिती याचा घेतलेला आढावा.
मुंबईत सहा लोकसभा मतदार संघात एकूण 98.8 लाख मतदार आहेत. एकूण 9 हजार 889 मतदान केंद्रांवर येत्या 20 मे रोजी ते मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. मुंबईतल्या सहा जागांवर उमेदवार घोषित होऊन प्रचार सुरु झाला. मुंबई दक्षिण आणि मुंबई उत्तर – मध्य येथून कोणाला तिकीट द्यायचे याचा सस्पेन्स शेवटपर्यंत होता. अखेर, उत्तर – मध्य मुंबईतून भाजपाने पूनम महाजन यांच्याऐवजी ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना तिकीट दिले. तर कॉंग्रेसने या जागेवर माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आमदार वर्षा गायकवाड यांना संधी दिली. मुंबई दक्षिण मधून शिवसेनेने (एकनाथ शिंदे) आमदार यामिनी जाधव यांना तिकीट दिले आहे.
मुंबईचे प्रवेशद्वार म्हटला जाणारा दहिसर चेक नाका या परिसरात आहे. मुंबईचे फुप्फुस म्हटले जाणारे संजय गांधी उद्यानही येथेच आहे. बहुसांस्कृतिक मतदार संघात 17.75 लाख मतदार आहेत. गुजरातील बहुल परिसर असलेल्या या परिसरात अलिकडेच दोन मेट्रो मार्गिका देखील सुरु करण्यात आल्या आहेत.
भाजप उमेदवार पियुष गोयल ( वय 59 ) : मुंबईकर पियुष गोयल हे व्यवसायाने सीए आहेत. त्यांचे घराणे पूर्वीपासून संघाशी एकनिष्ट राहिलेले आहे. गोयल यांची आई चंद्रकांता गोयल या भाजपाच्या तीन वेळा आमदार होत्या. वडील वेदप्रकाश गोयल हे पंतप्रधान वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात मंत्री होते. भाजपाचे राष्ट्रीय खजिनदार म्हणून त्यांनी दोन दशके जबाबदारी सांभाळली होती. पियूष गोयल हे ही राज्यसभेचे खासदार होण्यापूर्वी राष्ट्रीय खजिनदार म्हणून जबाबदारी पाहात होते. 2014 मध्ये गोयल यांच्याकडे कोळसा आणि ऊर्जा मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी दिली. आतापर्यंत रेल्वे, व्यापार, उद्योग आदी मंत्रालये त्यांनी सांभाळली आहेत. प्रथमच ते 2024 च्या लोकसभेत मुंबई उत्तरमधून नशीब आजमावत आहेत. उत्तर मुंबई परिसर गुजराती तसेच परप्रांतीयांची संख्या जास्त असलेल्या मतदार संघ आहे. भाजपासाठी सुरक्षित मतदार संघ आहे. येथून गेल्यावेळी गोपाळ शेट्टी हे चार लाखांच्या मताधिक्याने जिंकले आहेत. पियुष गोयल यांनी मागाठाणे, मालाड, दहीसर परिसराला झोपडपट्टी मुक्त करण्याचे आश्वासन दिले आहे.
कॉंग्रेसचे भुषण पाटील (वय 55) : पियुष गोयल यांच्या विरोधात कॉंग्रेसने मुंबई प्रदेश उपाध्यक्ष भुषण पाटील यांना उमेदवारी दिलीय. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत पाटील यांचा बोरीवली मतदारसंघातून गोपाळ शेट्टी यांनी 27,000 मतांनी पराभव केला होता. मुंबई कॉंग्रेस युनिटचे खजिनदार असलेले भूषण पाटील या मराठी चेहऱ्याला कॉंग्रेसने लोकसभेसाठी संधी दिली आहे. गोयल यांच्या विरोधात लढण्यासाठी कॉंग्रेसमध्ये फारसे कोणी उत्सुक नसल्याने येथे कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता होती.
परिस्थितीशी पटकन जुळवून घेण्याची हातोटी असलेल्या पियूष गोयल यांना येथे फायदा मिळू शकतो. परंतु, निवडणूक प्रचारात ते नवखे आहेत. केंद्रात मंत्री म्हणून विविध विकास योजना त्यांनी राबविल्या आहेत. वाढत्या उष्णतेच्या लाटेने मतदानाची टक्केवारी घसरल्यास त्यांना फटका बसू शकतो. विरोधात उभे असलेल्या कॉंग्रेसचे भूषण पाटील हे कमकुवत वाटत असले तरी सत्ताधाऱ्यांविरोधातील एण्टी इनकंबन्सीचा फायदा त्यांना मिळू शकतो. शिवसेना ठाकरे गटाची मते त्यांना मिळाली तर लाभ होईल. पण, हा भाजपाचा निष्ठावान मतदारांचा मतदार संघ असल्याने त्यांना अधिक धोका आहे.
लोकसंख्येने मोठा असलेल्या या मतदार संघात पायाभूत सुविधांचा विकास झालेला नाही. मानखुर्द, शिवाजीनगर, विक्रोळी, भांडुप, घाटकोपर या परिसरात झोपडपट्टीचा पसारा वाढला आहे. मेट्रोचे जाळे उभारण्यासाठी अनेक वर्षे लागणार आहेत. येथील नागरिकांना लोकल रेल्वेचाच आधार आहे. मिठागर आणि तिवरांनी भरलेला हा परिसर मजूरांचा आहे.
भाजपाचे मिहीर कोटेचा (वय 49) : हे व्यावसायिक आहेत. गेली तीन दशके भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. 2014 मध्ये विधानसभा निवडणूक हरले. नंतर, 2019 मध्ये मुलुंड विधानसभेतून जिंकले. मुलुंड पूर्व या गुजराती बहुल परिसरात धारावीतील लोकांचे पुनर्वसन करण्यास कोटेचा यांनी विरोध केला आहे. पूर्व उपनगरातील मिठागरांच्या खार जमिनीवर धारावी आणि इतर प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करावे अशी त्याची मागणी आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे संजय दीना पाटील ( वय 55 ) : माजी आमदार आणि तडफदार कामगार युनियन नेते दीना बाबा पाटील यांचे पूत्र संजय दीना पाटील हे 2004 रोजी निवडणूकीच्या मैदानात उतरले होते. त्यांनी भाडुंप विधानसभा जिंकली. त्यानंतर 2009 ला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक जिंकली. पण, 2014 मध्ये मोदी लाटेत भाजपचे किरीट सोमैय्या यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. 2019 च्या निवडणूकीत भाजपाच्याच मनोज कोटक यांनी त्यांचा पराभव केला. येथील मुस्लीम, दलित व्होट बॅंकेमुळे ठाकरे गटाने स्थानिक भूमीपूत्र म्हणून मराठी उमेदवार असलेल्या माजी खासदार संजय दीना पाटील यांनी संधी दिली आहे.
मिहीर कोटेचा यांचा गुजराती चेहरा म्हणून येथील गुजराती समाजाची मते मिळविण्यासाठी फायदा होऊ शकतो. परंतू एण्टी इनकंबन्सीचा फटका देखील बसू शकतो. ही जागा जिंकल्यास विधानसभेच्या निवडणूकीत पक्षाला फायदा होऊ शकतो. दुसरीकडे त्यांनी झोपटपट्टी पुनर्वसनास विरोध केला असल्याने त्याचाही फटका बसू शकतो तर, शिवसेनेचे (उबाठा) संजय दीना पाटील हा मराठी चेहरा असून कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे मते मिळाल्यास त्यांचा विजय सोपा होऊ शकतो. वंचितच्या उमेदवारांनी दलितांची मते खेचली तर मात्र त्याचा पाटील यांना फटका बसू शकतो.
सांताक्रुझ, वांद्रे ते माहीम या मुस्लीम, ख्रिश्चन बहुल परिसरात संमिश्र वस्ती असल्याने येथील जातीय समीकरण महत्वाचे ठरणार आहे. ईस्ट इंडियन, मुस्लीम आणि उत्तर भारतीय तसेच मराठी लोकांची वस्ती असल्याने येथून कॉंग्रेसला कायम हक्काची व्होट बॅंक मिळत होती. परंतू मोदी लाटेत हा मतदार संघ भाजपाकडे गेला.
भाजपचे उज्ज्वल निकम (वय 69) : मुंबई उत्तर मध्य लोकसभेत भाजपा कोणाला उमेदवारी देणार याचे सस्पेन्स कायम होते. अर्ज भरायला काही दिवस शिल्लक असताना भाजपाने पूनम महाजन यांच्याऐवजी ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना तिकीट देऊन सर्वांना आर्श्चयाचा धक्का दिला.
कॉंग्रेस आमदार वर्षा गायकवाड (वय 49) : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी गणल्या जाणाऱ्या धारावीतून चार वेळा आमदार असलेल्या माजी मंत्री वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबईतून लोकसभेचे तिकीट मिळाले आहे. माजी खासदार दिवंगत एकनाथ गायकवाड यांची कन्या असलेल्या वर्षा गायकवाड यांना शिवसेना ठाकरे गटाने समर्थन दिले आहे. उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान मातोश्री वांद्र्याचे कलानगर या मतदार संघात असल्याने प्रथमच ते कॉंग्रेसला मतदान करणार आहेत.
निष्णात वकील म्हणून समाजात असलेल्या प्रतिमेचा फायदा वकील उज्ज्वल निकम यांना मिळू शकतो. पण, त्यांना निवडणूकीचा कोणताही पूर्वानुभव नाही. सर्व पक्षातील मित्र संबंधाचा त्यांना फायदा मिळू शकतो. त्यांच्याविरोधात उभ्या असलेल्या वर्षा गायकवाड यांना सेक्युलर इमेजचा फायदा मिळू शकतो. कॉंग्रेस आमदार बाबा सिद्दीकी यांनी पक्ष सोडल्याने त्या मतदार संघातून फार काही लाभ मिळणार नाही. अनेक वेळा आमदार म्हणून निवडणूक आल्याने निवडणूक प्रक्रियेची संपूर्ण माहिती हा एक फायदा आहे. तर, नसीम खान यांना तिकीट न दिल्याने काही प्रमाणात मुस्लीम मतांचाही फटका बसू शकतो.
मुंबई दक्षिण हा उच्चभ्रू मलबारहिल, कुलाबा, कफ परेडपासून मुंबादेवी ते कनिष्ट मध्यमवर्ग रहात असणाऱ्या भायखळा, शिवडी, परळ, वरळी आणि लालबाग हा गिरणगाव म्हणून ओळखला जाणारा एके काळचा मराठी कामगारांचा गड राहिला आहे. येथे शिवसेना आणि कॉंग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत ( वय 72 ) : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दोन टर्मचे खासदार अरविंद सावंत येथे मोदी लाटेत निवडून आले आहेत. शिवसेनेचे 13 खासदार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बंडाळी करुन गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहिलेल्या पाच खासदारांपैकी अरविंद सावंत आहेत. 2014 मध्ये सावंत यांनी कॉंग्रेसच्या मिलिंद देवरा यांचा पराभव केला. भाजपाबरोबर असलेली शिवसेनेची युती तुटल्यानंतरसावंत यांनी केंद्रीय अवजड उद्योग मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव ( वय 56 ) : भायखळा येथील शिवसेनेच्या ठाकरे गटातून गटातून एकनाथ शिंदे गटात गेलेले महानगर पालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांना लोकसभेचे तिकीट मिळाले आहे. अरविंद सावंत यांच्याविरोधात मराठी चेहरा म्हणून यामिनी जाधव यांची निवड शिंदे गटाने केली आहे. भायखळाच्या आमदार आणि माजी नगरसेविका असलेल्या यामिनी जाधव यांना लोकसभेचे तिकीट मिळाले असले तरी त्यांना मलबार हिल येथील उच्चभ्रू भाजपा मतदारांची कितपत साथ मिळते हे येणारा काळच ठरविणार आहे.
अरविंद सावंत यांची प्रतिमा स्वच्छ आहे. त्यांची लोकसभेतील कामगिरी उजवी आहे. परंतु, मराठी व्होट बॅंकेवरच त्यांचा विजय अवलंबून आहे. मित्रपक्ष कॉंग्रेसच्या मतांची मदत मिळाली तर त्यांचा विजय सोपा होऊ शकतो. तर विरोधातील शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव या भायखळ्यातील आहेत. मलबारहिल सारख्या परिसरातून भाजपाची मते त्यांना मिळाल्यास फायदा होईल. पण, भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने आणि उद्धव ठाकरे यांना असलेल्या सहानुभूतीचा त्यांना फटका बसू शकतो.
मुंबई बेटाला उपनगरांशी जोडणारा हा पट्टा आहे. येथे तामिळ, सिंधी आणि पंजाबी यांची संक्रमण शिबिर स्वातंत्र्यकाळापासून वसलेली आहेत. मुंबईची वेस येथे संपते आणि उपनगरांची वेस सुरु होते. हा भाग संमिश्र वस्ती असलेला असून येथे मुस्लीमांची संख्या देखील मोठी आहे.
शिवसेना शिंदे गटाचे राहुल शेवाळे ( वय 51 ) : दोन वेळा खासदारकीची टर्म पूर्ण करणारे राहुल शेवाळे यांनी जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांना सोबत दिली. त्यांना पुन्हा खासदारकीचे तिकीट मिळाले आहे. या मतदार संघात त्यांची ताकद आहे. अवघ्या 29 व्या वर्षी ते प्रथम नगरसेवक म्हणून मुंबई पालिकेत निवडून आले होते. त्यानंतर ते स्टॅंडींग कमिटीचे अध्यक्ष झाले. आता ते शिवसेनेचे संसदेतील गट नेते आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई ( वय 66 ) : दोन टर्मचे राज्यसभा खासदार असलेले अनिल देसाई हे शिवसेनेचे निष्ठावंत आहेत. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय, शिवसेनेच्या कायदेशीर आणि संघटनात्मक बाबी सांभाळणारे अनिल देसाई उच्च शिक्षित मितभाषी आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण आणि निवडणूक चिन्हाची सुनावणी सुरु असताना अनिल देसाई यांनी मोठी भूमिका बजावली होती.
शेवाळे यांचा दोन दशके मतदार संघात दांडगा संपर्क आहे. परंतु, ठाकरे यांच्याशी गद्दारी केल्याने शिवसैनिकांच्या नाराजीचा फटका बसू शकतो. अणूशक्ती नगर, सायन- कोळीवाडा, धारावी येथील सरकारी योजनांचे लाभार्थ्यांकडील एक गठ्ठा मते मिळाली तर शेवाळे यांची लढाई सोपी होईल. त्यांच्या विरोधातील अनिल देसाई यांची इमेज स्वच्छ आहे. उद्धव ठाकरे यांना असलेल्या सहानुभूतीच्या लाटेचा फायदा त्यांना होऊ शकतो.
हा मतदार संघ निवासी आणि व्यापारी केंद्र अशा दोन्ही दृष्टीने ओळखला जातो. येथे एमआयडीसी तसेच सीप्झसारखे व्यापारी केंद्र आहे. मराठी लोकसंख्येबरोबरच उत्तर भारतीयांची तसेच दक्षिण भारतीय, गुजराती, बंगाली अशी संमिश्र वस्ती आहे. आरे कॉलनी, अंधेरी आणि वर्सोवा असा मेट्रोचे कारशेड तसेच पहिली मेट्रो लाभलेला हा परिसर आहे. आरे कॉलनीतील कारशेडमुळे झालेल्या वृक्षतोड, त्यातून झालेले पर्यावरणवाद्यांचे आंदोलन आणि भूयारी मेट्रो तीनला झालेला उशीर यामुळे हा भाग वादगस्त ठरला होता.
शिवसेना ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर ( वय 52 ) : शिवसेनेचे दोन वेळेचे खासदार असलेले गजानन कीर्तीकर यांचा मुलगा अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी अगदी सुरुवातीलाच उद्धव ठाकरे गटाने जाहीर केली होती. त्यामुळे येथून इच्छुक असलेल्या कॉंग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी महाविकास आघाडीला घरचा आहेर दिला होता. त्यानंतर त्यांनी खिचडी घोटाळ्यातील आरोपीच्या मांडीला मांडी लावणार नाही असा इशारा देत संजय निरुपम यांनी कॉंग्रेसला रामराम करून शिंदे गटात प्रवेश केला. गजानन कीर्तीकर यांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात उडी मारली होती. परंतु, मुलगा ठाकरे यांच्या सोबत राहिल्याने येथे पिता-पूत्रांची लढत होते की काय ? असे वातावरण सुरुवातीला होते. मात्र, गजानन कीर्तीकर यांनी माघार घेत मुलाचा रस्ता साफ केला. कोरोना काळातील सहा कोटीच्या खिचडी घोटाळ्यात अमोल कीर्तीकर यांना ईडीने नोटीस बजावल्याने त्यांच्यावर टांगती तलवार आहे. 2019 मध्ये त्यांनी गोरेगावमधून विधानसभा निवडणूक लढविली होती. पण, त्यांचा पराभव झाला होता.
शिंदे गटाचे रवींद्र वायकर ( वय 65 ) : जोगेश्वरी पूर्व येथून सलग तीन वेळा आमदार झालेले रवींद्र वायकर ठाकरे घराण्याशी अत्यंत निष्ठावान म्हणून ओळखले जात होते. पण, मनी लॉण्ड्रींग प्रकरणी ईडीचा ससेमिरा पाठी लागल्याने त्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. दरम्यान अभिनेता गोंविदा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने येथून गोविंदा यांना तिकीट मिळण्याची चिन्हे होती. पण, येथून रवींद्र वायकर यांना शिंदे गटाने उमेदवारी दिली.
शिवसेनेच्या पक्ष संघटनेचा फायदा अमोल कीर्तीकर यांना मिळू शकतो. परंतु, त्यांच्यावर खिचडी घोटाळ्याचे आरोप असल्याने ही चिंता आहे. वडील खासदार असल्याने त्यांच्या छत्रछायेखाली स्वतंत्र अस्तित्व तयार केल्याने फायदा होईल. ईडी प्रकरणाची टांगती तलवार देखील त्यांच्यावर आहे. अनेक निवडणूक लढविण्याचा फायदा त्यांचे विरोधी उमेदवार शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांना मिळू शकतो. परंतू उद्धव ठाकरे यांना मिळणारी सहानुभूती त्यांची वाट अवघड करु शकते.