loksabha 2024 Satara : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपाचे कमळ? काय आहेत साताऱ्यातील राजकीय समीकरणे

| Updated on: Mar 07, 2024 | 7:53 PM

साताऱ्याच्या याच एका प्रसंगामुळे शरद पवार यांच्याबद्दल एक सहानुभूतीची लाट निर्माण झाली. त्याचा फायदा पुढील विधानसभा निवडणुकीत झाला आणि एक हाती सत्ता मिळवण्याच्या भाजपच्या महत्वाकांक्षेवर पाणी फेरलं.

loksabha 2024 Satara :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपाचे कमळ? काय आहेत साताऱ्यातील राजकीय समीकरणे
satara loksabha
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

नवी दिल्ली | 6 मार्च 2024 : 1999 पासून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात असलेला बारामती वगळता राज्यातला एकमेव मतदारसंघ म्हणजेच सातारा लोकसभा मतदारसंघ. 1999 आणि 2004 च्या निवडणुकीत येथून राष्ट्रवादीचे लक्ष्मणराव जाधव विजयी झाले. त्यानंतर या मतदारसंघावर 2009, 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचेच खासदार म्हणून उदयनराजे भोसले निवडून आले. उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपचे कमळ हाती घेतले. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत पुन्हा राष्ट्रवादीचेच श्रीनिवास पाटील निवडून आले. मोदी लाटेतही राष्ट्रवादी कॉंग्रेसला साथ देणारा हा मतदारसंघ. त्याचप्रमाणे तीन वेळा खासदार राहिलेले उदयनराजे भोसले यांनी पक्ष बदलताच त्यांनाही पराभवाची धूळ चाखणारा हाच मतदारसंघ. मात्र, राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्यात पुन्हा एकदा शरद पवार आपला करिष्मा दाखविणार की येथे भाजपचे कमळ फुलणार? याचीच चर्चा होताना दिसत आहे.

शरद पवार यांची गाजलेली ती पावसातील सभा

उदयनराजे यांनी 2019 ची लोकसभा राष्ट्रवादीमधून लढविली आणि ते जिंकलेही. मात्र, निवडून आल्यानंतर त्यांनी अवघ्या चार महिन्यात राजीनामा दिला. त्या जागेवर पुन्हा पोटनिवडणूक लागली. राष्ट्रवादीने श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली. पाटील हे शरद पवार यांचे जिवलग मित्र. त्यांच्या प्रचारासाठी शरद पवार साताऱ्यात आले. सभा सुरु होती आणि अचानक धो धो पाऊस सुरु झाला. शरद पवार यांनी पावसाची पर्वा न करता सभा घेतली. साताऱ्याच्या याच एका प्रसंगामुळे शरद पवार यांच्याबद्दल एक सहानुभूतीची लाट निर्माण झाली. त्याचा फायदा पुढील विधानसभा निवडणुकीत झाला आणि एक हाती सत्ता मिळवण्याच्या भाजपच्या महत्वाकांक्षेवर पाणी फेरलं.

सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर, शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील असे शरद पवार यांचे मुख्य मोहरे होते. मात्र पक्षात झालेल्या बंडखोरीत शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील यांनी शरद पवार यांची साथ सोडली नाही. तर, रामराजे नाईक निंबाळकर आणि वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी अजितदादा यांच्यासोबत जाणे पसंद केले. तर, दुसरीकडे भाजपनेही आपले हातपाय या जिल्ह्यात पसरविण्यास सुरवात केली.

2024 सालच्या निवडणुकीतही पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील विरुद्ध भाजपचे उदयनराजे अशीच लढत रंगणार असल्याचे चित्र आहे. लोकसभा पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील यांनी लाखाच्या फरकाने उदयनराजे भोसले यांचा पराभव केला. हा पराभव भाजप नेतृत्वाच्या जिव्हारी लागला आहे. तेव्हापासूनच भाजपने लोकसभा प्रभारी म्हणून डॉ. अतुल भोसले यांच्याकडे जबाबदारी देऊन मतदारसंघ बांधणीला सुरुवात केली होती.

डॉ. अतुल भोसले यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पक्षाचे मजबुत केडर तयार निर्माण केले. त्याच बळावर ते विजयाचा दावा करत आहेत. याशिवाय सातारा लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभांपैकी चार जागी महायुतीचे वर्चस्व आहे. जावळी मतदारसंघात भाजपचे शिवेंद्रराजे भोसले, कोरेगाव मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे महेश शिंदे, पाटण मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे शंभुराज देसाई, वाई मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मकरंद पाटील असे महायुतीचे बळ आहे. तर, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बाजूने कराड उत्तर मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब पाटील आणि कराड दक्षिण मतदारसंघातील कॉंग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण असे दोन आमदार आहेत.

कराड फॅक्टर चालणार का?

लोकसभा निवडणुकीत ज्या उमेदवारामागे कराड उभा राहतो त्याचा विजय पक्का असे मानले जाते. कराड भागातील कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटण हे तीन मतदारसंघ येतात. लोकसभेच्यावेळी हे तिन्ही मतदारसंघ काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मागे ठामपणे उभे राहतात असा येथील इतिहास आहे. सातारामधून कितीही लीड मिळाला तरी तो मोडला जातो तो याच तीन मतदार संघातून. त्यामुळे कराड ज्याच्या मागे तोच खासदार हे गणित ठरलेले आहे.

विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील हे पाटण तालुक्यातील आहेत. त्यामुळे आमदार शिंदे गटाचे असले तरी त्यांना पाटणमधून पाठिंबा मिळेल. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचेही मूळ गाव पाटण हेच आहे. ही राष्ट्रवादी शरद पवार गटाची जमेची बाजू आहे. मात्र, राजकारणात कधीही काहीही होऊ शकते याचा अनुभव दोन घटनावरून राज्याला आला आहे. त्यामुळे जरी सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असला तरी भाजपचे येथे कमळ फुलणार की नाही याचे उत्तर काही दिवसातच कळेल.