लोकसभेच्या निवडणूकांच्या पाचव्या टप्प्याचे मतदान महाराष्ट्रातील 13 लोकसभेच्या जागांवर येत्या 20 मे रोजी होत आहे. या महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूकांचा हा शेवटचा टप्पा आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. उत्तर प्रदेशनंतर हा सर्वात मोठा आकडा आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात यंदा सभांचा धडाका लावला होता. गेल्या चार टप्प्यात महाराष्ट्रातील 35 जागांवर मतदार पार पडले आहे. सोमवार 20 मे रोजी भिवंडी, धुळे, नाशिक, दिंडोरी, पालघर, धुळे, कल्याण, ठाणे आणि मुंबईतील सहा लोकसभा अशा एकूण 13 जागांवर मतदान होणार असून दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. या मतदानावेळी केंद्रीय मंत्री पियूष गोयल, भारती पवार, कपिल पाटील, सुभाष भामरे असे मंत्री तर मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूत्र श्रीकांत शिंदे आणि वकील उज्जव निकम यांचे भवितव्य निश्चित होणार आहे.
धुळे लोकसभा मतदार संघात यंदा चुरशीची लढत होणार आहे. साल 2009 ते 2019 पर्यंतही जागा भाजपाची राहीली आहे. साल 2009 मध्ये येथून भाजपाचे प्रताप सोनवणे विजयी झाले होते. तर साल 2014 च्या मोदी लाटेत आणि नंतर साल 2019 मध्ये येथे सलग दोनदा भाजपाच्या सुभाष भामरे यांच्यावर जनतेने विश्वास दाखवला. आताही तिसऱ्यांदा भाजपाच्या विद्यमान खासदार भामरे उभे राहीले आहेत. डॉ. सुभाष भामरे यांच्या विरोधात नाशिकच्या कॉंग्रेसच्या आमदार डॉ.शोभा बच्छाव यांना उमेदवारी मिळाली आहे. गेल्या निवडणूकीत बागलाणने भाजपाला 74 हजाराचे मताधिक्य दिले होते. आता येथे कांद्याचा निर्यातबंदीचा विषय पेटला आहे. कॉंग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांना वंचितचा उमेदवार माजी आयपीएस अधिकारी अब्दुर रेहमान यांच्यामुळे धोका असून तिरंगी सामना होणार आहे.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सलग तीन वेळा भाजपचे कमळ फुलले आहे. भाजपने विद्यमान खासदार डॉ. भारती पवार यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. भारती पवार या केंद्रात राज्य मंत्री आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भारती पवार यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. त्यांचा भाजपकडून पराभव झाला होता. भारती पवार राष्ट्रवादी सोडून भाजपात गेल्या होत्या. गेल्या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात दिंडोरीत चुरशीची लढत झाली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने भास्कर भगरे यांना तिकीट दिले आहे. दिंडोरी लोकसभा आदिवासी प्राबल्य असलेला मतदार संघ आहे. त्यामुळे यंदाही चुरशीची लढत होणार आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या सहा जागा आहेत. सहापैकी 4 जागा राष्ट्रवादीकडे आहेत. एका जागेवर भाजपचा तर एका जागेवर शिवसेनेचा आमदार आहे.
नाशिक मतदार संघातून सुरुवातीपासून छगन भुजबळ इच्छुक होते. परंतू या मतदार संघातून एकनाथ शिंदे सेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे इच्छुक असल्याने त्यांनी शक्तीप्रदर्शन करीत हा मतदार संघ भाजपाकडून अखेर घेतलाच. त्यामुळे भुजबळ नाराज झाले. आता शिंदे सेनेचे हेमंत गोडसे आणि महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शांतीगिरी महाराजांमुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे.
पालघर – पालघर लोकसभा मतदार संघात एकूण दहा उमेदवार रिंगणात आहेत. परंतू मुख्य लढत भाजपाने हेमंत विष्णू सावरा, ठाकरे गटाचे उमेदवार भारती कामडी आणि बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांच्यात होणार आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने शेवटच्या क्षणी बोईसरचे आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे येथे तिरंगी सामना होणार आहे. या लोकसभा मतदार संघात बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार आहेत. येथून वंचितच्या विजया म्हात्रे, तसेच बसपाचे भरत वनगा देखील उभे आहेत.
महाराष्ट्रातील भिवंडी लोकसभा मतदारसंघात 2014 आणि 2019 मध्ये भाजपाचे कपिल पाटील सलग दोनदा निवडून आले. आता त्यांना तिसऱ्यादा भाजपाने तिकीट दिले आहे. तर त्यांची लढत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुरेश गोपीनाथ म्हात्रे यांच्याशी होणार आहे. 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या कपिल पाटील यांनी काँग्रेसच्या सुरेश काशिनाथ तावडे यांचा 1.56 लाख मतांनी पराभव केला होता. 2014 च्या निवडणुकीतही भाजप आणि काँग्रेसमध्येच प्रमुख लढत झाली होती. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे सुरेश तावडे विजयी झाले होते.
कल्याण लोकसभा मतदार संघातून एकनाथ शिंदे यांचे पूत्र श्रीकांत शिंदे सलग दोनदा निवडून आले आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. येथून ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर उभ्या राहील्या आहेत. वैशाली दरेकर दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांना मनसेच्या तिकीटावर 2009 ची लोकसभा निवडणूक लढविली होती. परंतू त्या तिसऱ्या स्थानावर होत्या. आता ठाकरे गटातून लोकसभा लढवित आहेत.