लोकसभा निवडणुकीचा रणसंग्रामात आज देशभरात चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. महाराष्ट्रातहा 11 मतदारसंघात आज मतदान होत आहे. मागच्या तीन टप्प्यांप्रमाणे चौथ्या टप्प्यातसाठीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात तळ ठोकून सभांचा सपाटा लावला होता. प्रचारसभांदरम्यान मोदींनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नकली म्हणत त्यांच्यावर घणाघाती आरोप केले होते.त्या टीकेला उद्धव ठाकरे तसेच संजय राऊत यांनीही चोख प्रत्युत्तर दिले. आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी मोदी-शाह या जोडीवर कडाडून टीका केली आहे. खासदार संजय राऊत यांनी दैनिक सामनासाठी त्यांची मुलाखत घेतली. त्यामध्ये त्यांनी दोघांवरही टीकास्त्र सोडले. नकली शिवसेनेच्या मुद्यावरूनही उद्धव ठाकरेंनी त्यांना प्रत्युत्तर दिले.
ज्या शिवसेनेसोबत 25 वर्षे सत्ता भोगली ती शिवसेना नकली कशी ?
मोदी शहांकडून महाराष्ट्रात येऊन शिवसेनेचा वारंवार नकली शिवसेना असा उल्लेख होत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे वैचारिक किंवा शिवसेनेचे वारसदार उद्धव ठाकरे नाही, असा उल्लेखही त्यांनी केला. मात्र त्यांची ही टीका शिवसेनेला फारशी रुचलेली नाही. त्या मुद्यावरून बोलताना उद्धव ठाकरेंनी मोदी शहांना सुनावलं. बाळासाहेबांची शिवसेना म्हणण्याआधी त्यांनी बाळासाहेबांना ‘हिंदुहृदयसम्राट’ म्हटलं पाहिजे. कारण त्यांचं ते दुखणं आहे की त्यांना अजून कोणीही हिंदूचा कैवारी म्हणतच नाहीये. त्यांच्या काळाला १० वर्ष झाली तरी मुंबई आणि महाराष्ट्रात हिंदूंना आक्रोश मोर्चे काढावे लागत आहेत. म्हणजे त्यांच्या राज्यात हिंदू सुरक्षित नाहीत, असे परखड मत उद्धव ठाकरे यांनी मांडले.
मला औरंगजेबाचा फॅन म्हणतात, त्याच्या राजकीय वडिलांची विचारसरणी काय ?
बरं, वैचारिक म्हणाल तर मी श्यामाप्रसाद मुखर्जींपर्यंत जाईन. भाजपचा राजकीय बाप म्हणजे जनसंघ. श्यामाप्रसाद मुखर्जी हे जनसंघाचेय म्हणजे यांची वृत्ती कशी आहे बघा. संयुक्त महाराष्ट्राची जी समिती होती, त्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ते कधी उतरले नाहीत. पण निवडणूक लढायला म्हणून संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये घुसले. काही मिळवता आलं तर मिळवांव म्हणून जागावाटपाचं भांडण केलं, जागावाटप होऊनही त्यांनी सातएक जागा जास्त लढवल्या.
तेव्हा माझ्या आजोबांनीसुद्धा इशारा दिला, मग ते बाहेर पडले. म्हणजे लढ्यात ते कुठेच उतरले नाहीत. श्यामाप्रसाद मुखर्जींनी त्या वेळेला बंगालच्या फाळणीला पाठिंबा दिला आणि ज्या मुस्लीम लीगने… आज मला हे लोक औरंगजेबाचा फॅन क्लब म्हणतात त्यांच्या राजकीय वडिलांची विचारसरणी काय होती ? असा खडा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.
भाजपने मला हिंदुत्व शिकवावं ?
त्या श्यामाप्रसाद मुखर्जींनी, तत्कालिन मुस्लीम लीगने देशाची फाळणी मागितली. गांधीजी आणि काँग्रेसने इंग्रजांना ‘चले जाव’चे आदेश दिला आणि श्यामाप्रसाद मुखर्जींनी तिथल्या गव्हर्नरला सांगितलं की चले जावची चळवळ चिरडली गेली पाहिजे. तिच्याशी मुकाबला केला पाहिजे. तत्कालीन मुस्लीम लीगच्या फडलूल हक यांच्या मंत्रिमंडळात श्यामाप्रसाद मुखर्जी ११ महिने अर्थमंत्री होते. याचा अर्थ तुम्ही काय सांगाल ? आणि भाजपने मला हिंदुत्व शिकवावं ? त्यांनी मला बाळासाहेबांचे विचार शिकवावे? आणि त्यांच्याकडून मी शिकायचं ? असा सवाल विचारत उद्धव ठाकरे यांनी टीका केली.