लग्न… प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील आनंदाचा, महत्वाचा प्रसंग. पण त्याहून महत्वाचं असतं ते आपल्या राष्ट्राप्रती, आपल्या देशाप्रती असलेलं कर्तव्य. हेच लक्षात ठेवत रामटेकमध्ये एका नवरदेवाने बोहल्यावर चढण्यापूर्वी त्याचं मतदानाचं कर्तव्य बजावलं. लग्न मंडपात जाण्यापूर्वी, लग्नाच्या वरातीसाठी घोड्यावर बसण्यापूर्वी तो नवरदेव मतदान केंद्रावर गेला आणि आधी त्याने मतदानाचा हक्क बजावला. आधी मतदान मगच लगीन .. अशा त्याच्या बाण्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.
देशभरासह आज महाराष्ट्रातही लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली असून विदर्भात आज मतदान होत आहे. सकाळपासूनच तरूण, म्हातारे कोतारे, मध्यमवयीन नागरिक , मतदानासाठी सर्वजण उत्साहाने बाहेर पडले आहेत. एवढंच नव्हे तर दिव्यांग नागरिकही त्यांचं मतदानाचं कर्तव्य बजवाताना दित आहेत.
त्यातच रामटेकमध्ये एका तरूण मतदाराने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अंगात शेरवानी, डोक्यावर पगडी, कपाळाला मुंडावळ्या अशा वेशातील एक तरूण मतदान केंद्रावर आला आणि सर्वांच्या नजरा त्याच्याकडेच वळल्या. स्वप्नील डांगरे असे त्या तरूणाचे नाव असून लग्न मंडपात जाण्यापूर्वी तो मतदान केंद्रावर आला, अन् तेथे त्याने मतदानाचा हक्क बजावला. योग्य लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी आपण मतदान केलं असं स्वप्नीलने आवर्जून सांगितल. जास्तीत जास्त लोकांनी मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहनही त्याने नागरिकांना केलं. नवरदेवाचा हा उत्साह पाहून लोकं त्याचे कौतुक करत आहेत. रामटेकमध्ये महायुतीचे राजू पारवे विरुद्ध महाविकास आघाडीचे श्यामकुमार बर्वे अशी लढत आहे.
महाराष्ट्रात पहिल्या टप्यातील मतदान सुरू
आज देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानास सुरूवात झाली आहे. देशात पहिल्या टप्प्यासाठी 102 जागांवर मतदान होत आहे. महाराष्ट्रातही पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू झाले आहे. राज्यात लोकसभेच्या 48 जागांसाठी एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. रमटेक. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर आणि भंडारा-गोंदिया या पाच मतदारसंघात पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. आज सकाळी नितीन गडकरी, प्रतिभा धानोरकर, प्रफुल पटेल, राजू पारवे, मोहन भागवत, चंद्रशेखर बावकुळे, विकास ठाकरे यांसारख्या नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला. जास्तीत जास्त नागरिकांनी घराबाहेर पडून मतदानाचे कर्तव्य पार पाडावे असे आवाहन नेत्यांनी केले.
मुख्य लढत कोणाची ?
>> नागपुरात भाजपचे नितीन गडकरी, काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यात लढत
>> चंद्रपूरमध्ये भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर
>> रामटेकमध्ये महाविकास आघाडीचे श्याम बर्वे, महायुतीचे राजू पारवे आणि वंचितचे किशोर गजभिये
>> गडचिरोली-चिमूरमध्ये महाविकास आघाडीचे नामदेव किरसान, महायुतीचे अशोक नेते आणि वंचितचे हितेश मडावी. या ठिकाणी दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान असेल. नक्षली भाग आहे.
>> भंडारा-गोंदियात महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे, महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे आणि वंचितचे संजय केवट