पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज मुंबईत सभा आहे. मुंबईसह राज्यातील 13 जागांवर पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी येत्या 20 मे रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. मोदी यांनी दोन दिवसांपूर्वीच मुंबई आणि कल्याणमध्ये रोड शो केला होता. त्यानंतर होणाऱ्या या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आपल्या सभेतून मोदी विरोधकांवर काय हल्ला चढवतात? मोदींच्या निशाण्यावर शरद पवार असतील की उद्धव ठाकरे की काँग्रेस? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर सभा होत आहे. 6 वाजून 20 मिनिटांनी मोदी मुंबई विमानतळावर येणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता या सभेला सुरुवात होणार आहे. मात्र, या सभेपूर्वी पंतप्रधान तीन महत्त्वाच्या गोष्टी करणार आहेत. एक म्हणजे मोदी दादरला येताच सर्वात आधी चैत्यभूमीवर जाणार आहेत. चैत्यभूमीवर जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मोदी अभिवादन करतील. त्यानंतर मोदी स्वातंत्र्यवीर स्मारकात जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन करणार आहेत. नंतर ते शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरे स्मृती स्थळाला भेट देऊन अभिवादन करणार आहेत.
पंतप्रधान कार्यालयाकडून विनंती मान्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चैत्यभूमी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, स्वातंत्रवीर सावरकर स्मारक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन करण्याची विनंती दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी पंतप्रधान कार्यालयाला केली होती. ही विनंती आज पंतप्रधान कार्यालयाने मंजुर केली असल्याची माहिती राहुल शेवाळे यांनी दिली आहे. त्यानुसार पंतप्रधान या तिन्ही महत्त्वाच्या ठिकाणी जाऊन अभिवादन करणार आहेत.
राज ठाकरे पहिल्यांदाच मोदीसोबत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला महायुतीचे सर्वच नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र, यातील सर्वात मोठं आकर्षण असणार आहेत ते म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे. राज ठाकरे हे पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मंचावर असणार आहेत. प्रोटोकॉलनुसार राज ठाकरे यांचं भाषण सर्वात आधी होईल असं सांगण्यात येत आहे. मात्र, मोदींच्या समोर राज ठाकरे काय बोलतात? राज ठाकरे यांच्या निशाण्यावर कोण असेल? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सभेनिमित्त वाहतुकीत बदल
दादर परिसरात अनेक ठिकाणी वाहनांसाठी नो पार्किंग झोन
मुख्य मार्गावर वाहतुकीत करण्यात आले मोठे बदल
दुपारनंतर दादरमधील अनेक रस्ते गरजेनुसार वाहतुकीसाठी बंद राहणार
सावरकर मार्ग, केळुस्कर रोड, केळकर मार्ग या रस्त्यावर पार्किंग करता येणार नाही
आवश्यकता भासल्यास अनेक मुख्य रस्ते देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार
सभेसाठी येणाऱ्या वाहनांसाठी देखील विशेष पार्किंग व्यवस्था