पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना संजय राऊत यांची जीभ घसरली; ‘त्या’ उल्लेखाने राजकारण तापणार?

| Updated on: May 10, 2024 | 11:01 AM

नरेंद्र मोदींनी बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेबांबद्दल मोदींनी केलेल्या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान झाला आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना संजय राऊत यांची जीभ घसरली; त्या उल्लेखाने राजकारण तापणार?
Follow us on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. शिवसेनेला नकली म्हटले, त्यांच्या या विधानाचे पडसाद उमटू लागले असून उद्धव ठाकरे यांनी मोदींना चोख प्रत्युत्तर दिलं. मोदींचं हे विधान शिवसेनेच्या नेत्यांनाही पटलं नसून आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही या विधानाचा समाचार घेतला. मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेबांबद्दल मोदींनी दळभद्री वक्तव्य केलं, तो संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. ठाकऱ्यांना नकली संतान म्हणणारेच औरंगजेबाचे संतान अशी टीकाही त्यांनी केली.

संजय राऊतांचा संताप़

उद्धव ठाकरेंना कोणी नकली संतान म्हणत असेल तर तो महाराष्ट्राचा अपमान आहे. मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांना संपूर्ण राज्य मानायचं, लोकं त्यांची पूजा करतात. मात्र मोदी हे विसरले आहेत. त्यांच्या डोक्यात काही गडबड झालीये असं वाटतंय. मा. बाळासाहेब आणि माँसाहेब यांच्या मुलाबद्दल असं विधान करणं, शिवसेनेला नकली म्हणणं हा राज्याचा अपमान आहे. तुमची एवढी हिंमत?  त्यांना तुम्ही नकली म्हणता ? कोणी बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांचा अपमान करत असेल तर महाराष्ट्र हे सहन करणार नाही. तुम्ही तुमच्या संतानाबद्दल ( मुलांबद्दल ) बोला की… तुम्ही उद्धव ठाकरेंबद्दल असं विधान करत असाल तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज आहात, त्याचे संतान आहात अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली. जे महाराष्ट्रावर चालून येतील त्यांना आम्ही गाडू, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जे वक्तव्य ( गद्दार) केलं त्याचेही राजकीय पडसाद उमटू लागले आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. त्या जे बोलल्या ते खरं आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या ४० लोकांना संपूर्ण देश गद्दार म्हणतात. हो की नाही ? शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या लोकांना गद्दार म्हटलं जातं, असं राऊत म्हणाले.

आमच्या सभेला भाड्याने लोकं आणावी लागणार नाहीत

उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी शिवाजी पार्क मैदानाची मागणी करण्यात आली होती . मात्र आता ती परवानगी मनसेला देण्यात आली, यासंदर्भात राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. यालाच तर सुडाचं राजकारण म्हणतात. सत्तेचा गैरवापर, लफंगेगिरी म्हणतात. हे भीतीतून होत आहे. महाराष्ट्रात आणि मुंबईत आम्ही कुठेही सभा घेतली तरी लोकं आमच्या सभेला येतील, भाड्याने लोकं आणावी लागणार नाही, असा टोला त्यांनी लगावला. लांडगे एकत्र येत आहेत, शिवाजी पार्क येथील सभेवरून त्यांनी टीका केली.