होय, मी भटकती आत्मा, जनतेसाठी शंभर वेळा… शरद पवार यांचं मोदींना सडेतोड उत्तर काय?

| Updated on: Apr 30, 2024 | 3:24 PM

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार शिरूरच्या दौऱ्यावर आहेत. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शरद पवार आले होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेचा समाचार घेतला. मोदी यांनी शरद पवार यांचा उल्लेख भटकती आत्मा केला होता. याच मुद्द्यावरून पवारांनी मोदींना घेरले. जनतेच्या प्रश्नासाठी मी भटकतच राहील, असं उत्तर पवार यांनी दिलं.

होय, मी भटकती आत्मा, जनतेसाठी शंभर वेळा... शरद पवार यांचं मोदींना सडेतोड उत्तर काय?
शरद पवार यांचं मोदींना सडेतोड उत्तर
Follow us on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. शरद पवार हे भटकती आत्मा असून त्यांनी राज्य अस्थिर ठेवल्याचा आरोप मोदी यांनी केला होता. मोदी यांच्या या आरोपाला शरद पवार यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. होय, मी भटकती आत्मा आहे. जनतेसाठी मी शंभरवेळा अस्वस्थ राहील, असं प्रत्युत्तर शरद पवार यांनी दिलं. शिरुरमध्ये अमोल कोल्हे यांच्या प्रचारसभेत बोलताना शरद पवार यांनी हे सडेतोड उत्तर दिलं.

ईडीचा मी एक टक्काही वापर करत नाही, असं पंतप्रधान काल म्हणाले होते. जनतेचा ज्यांच्यावर विश्वास आहे, त्यांना तुम्ही तुरुंगात टाकता. आता तुम्ही एक टक्का म्हणा की आणखी काही म्हणा. तुम्ही हुकूमशाहीच्या दिशेने जात आहात. माझ्या बोटाला धरून राजकारणात आलेले, आता माझ्याबद्दल काय बोलतात? एक आत्मा भटकत आहे असं तुम्ही म्हणाला. त्या आत्म्यापासून सुटका व्हायला हवी, अस मोदी म्हणाले. पण हा अस्वस्थ आत्मा स्वतःसाठी नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, महागाईतून जनतेची सुटका करण्यासाठी आहे. यासाठी मी शंभरवेळा अस्वस्थता दाखवेन. हे संस्कार यशवंतराव चव्हाणांचे आहेत, त्यात आम्ही तडजोड करणार नाही, असं शरद पवार यांनी ठासून सांगितलं.

मोदी काहीही बोलत आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावरही टीका केली होती. या टीकेचाही शरद पवार यांनी समाचार घेतला. राहुल गांधींवर टीका करतात. साहबजादे क्या करेंगे? मोदींना कायतरी वाटायला हवं. राहुलच्या तीन पिढ्या देशासाठी झटल्या आहेत. देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी झटले आहेत. गरिबी हटविण्यासाठी इंदिरा गांधींची हत्या झाली. आधुनिकेतवर देश पुढं जावा, यासाठी लढा उभारणाऱ्या राजीव गांधींची हत्या झाली. वडील आणि आज्जींनी देशासाठी बलिदान दिलं. त्या राहुल गांधींना म्हणतात साहबजादे काय करणार? कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा काढली, जनतेचे प्रश्न जाणून घेतले. पण याबाबत बोलण्याऐवजी मोदी काहीही बोलत आहेत. खोट्या गोष्टी सांगत, चुकीच्या पद्धतीने टीका टिप्पणी करत आहेत. त्यामुळे अशा लोकांच्या हातातून सत्ता काढून घेणं गरजेचं आहे, असं शरद पवार म्हणाले.

सत्तेचा दुरुपयोग केला जातोय

जे चांगले काम करतात, ते सत्तेचा दुरूपयोग करतात. मुळात सत्ता ही जनहिताच्या कामासाठी करायची असते, याचा विसर सत्ताधाऱ्यांना पडला आहे. जनतेला अडचणीतून दूर करण्यासाठी सत्तेचा वापर करायचा असतो, इथं अडचणीत आणण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला जातोय, असा हल्लाबोल पवार यांनी केला.

ते आयुष्यभर विसरणार नाही

यावेळी शरद पवार यांनी एक किस्सा सांगितला. 1960 साली मी पुण्यात शिक्षण घेत होतो. यशवंतराव चव्हाण साहेबांबद्दल प्रचंड आदर होता. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू होती. हे मराठी राज्य व्हावं यासाठी प्रचंड संघर्ष झाला. त्यावेळी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी महाराष्ट्र राज्याची घोषणा केली. तो दिवस होता 1 मे 1960. त्यावेळी आम्ही विद्यार्थी होतो, या चळवळीत आम्ही मोठ्या संख्येने सहभागी झालो होतो. त्यावेळी यशवंतराव चव्हाण शिवनेरीवर येऊन घोषणा करतील आणि मग पंतप्रधान मुंबईमध्ये अधिकृत घोषणा करतील, असं ठरलं होतं. ही बातमी आम्हाला समजताच, आम्ही सगळे शिवनेरीवर आलो. आयुष्यात पहिल्यांदा मी शिवनेरीवर आलो होतो. त्यावेळी प्रथमतः यशवंतराव चव्हाणांना आम्हाला पाहता आलं. हे आम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही. पुढं याचं महाराष्ट्राचे नेतृत्व करायला मिळालं. साल होतं 1967. त्यापुढं मी 14 वेळा निवडणुका लढल्या आणि त्या जिंकल्या. जनतेचं दुखणं मांडण्याची संधी मला जनतेने दिली, असं त्यांनी सांगितलं.