देशभरात आज लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू असून महाराष्ट्रातही ११ जागांवर मतदान होत आहे. जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, नंदूरबार, अहमदनगर, शिर्डी या 11 लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. राज्यातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतदारांनी आज सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लावायला सुरूवात केली. दरम्यान सुप्रसिद्ध गायक-संगीतकार सलील कुलकर्णी यानेही पुण्यात मतदानाचा हक्क बजावला. सलील कुलकर्णी यांनी मुलगा शुभंकर कुलकर्णी याच्यासह मतदानाचे कर्तव्य पार पाडले. यावेळी त्याने जास्तीत जास्त लोकाना घराबाहेर पडण्याचे आणि मतदानाचे कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन केले.
सोशल मीडियावर भांडून काहीही होत नाही
मतदानानंतर माध्यमांशी बोलताना सलील कुलकर्णी यांनी प्रतिक्रिया दिली. सोशल मीडियावर भांडून काहीही होत नाही , विचार करून मतदान करायला हवं असं ते म्हणाले. लहानपणी जसा बाळाला पोलिओ डोस दिला जातो, बाळाचं व्हॅक्सिनेशन केलं जातं तसच मतदान प्रक्रिया ही सुद्धा मूलभूत गोष्ट आहे. मतदान ही कंपल्शन करण्यासारखी गोष्टच नाही, ते स्वतःला आतून वाटलं पाहिजे.. तुम्हाला फिरायला जायचं असेल, ट्रीप काढायची असेल तर वर्षभरात तुम्ही ते करू शकता. पण मतदानासाठी तुम्ही जर एक दिवसही कॉम्प्रमाईज करू शकत नसाल, तर पुढची पाच वर्षे तुम्ही कुठल्याही गोष्टीवर ओपिनियन देण्याचा, मत मांडण्याचा हक्क गमावता. नुसतं सोशल मीडियावर, किंवा कॅफेमध्ये बसून चर्चा करायची नाही, तर घराबाहेर पडायचं आणि रांगेत उभे राहून मतदान करायचं, असं आवाहन त्यांनी केलं.
दररोज बाहेर पडताना मुली, महिलांना सुरक्षित वाटलं पाहिजे हा पहिला बेसिक मुद्दा आहे. आणि देशात डेव्हलपमेंट झाली पाहिजे, जेणेकरून आपल्या देशातला मुलगा हा बाहेरच्या देशात गेला नाही पाहिजे, अशा अपेक्षा त्याने येणाऱ्या सरकारकडून व्यक्त केल्या.
पहिल्यांदा खूप वेळ रांगेत उभे राहण आम्ही सेलिब्रेट केलं – प्रविण तरडे
अभिनेते प्रविण तरडे यांनीही सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनीही प्रतिक्रिया दिली. ‘ आज मतदान केंद्रावर ज्या रांगा लागल्यात, जी गर्दी झाली आहे ते पाहून मला पहिल्यांदा आनंद झालेला आहे. पहिल्यांदा खूप वेळ रांगेत उभे राहण आम्ही सेलिब्रेट केलं. पुण्याचे संस्कार आणि पुण्याची संस्कृती ही या रांगांमधून दिसली. मुरलीधर मोहोळ मावस माझा भाऊ आहे, नात्यात्यातला माणूस जर उभा असेल तर त्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. त्यामुळे माझ्या शिकल्या सवरलेल्या भावासाठी मी शूटिंग बंद करून मैदानात उतरलेलो आहे’ असे ते म्हणाले.
ही लोकशाहीची निवडणूक आहे, माझ्या घरातला तुटलेला नळ त्या खासदाराने येऊन दुरुस्त करावा अशी माझी अपेक्षा नाही. मी खासदार देशासाठी, देशांच्या सुरक्षित सीमांसाठी, देशातील उत्तम उत्तम कायद्यांसाठी निवडून देत आहे. मतदानाची सुट्टी घेऊन ट्रीप एन्जॉय करायला गेलेल्या प्राण्यांबद्दल न बोललेलं बरं, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. महिलांनी कुठलीही सबब न सांगता घरातून बाहेर पडून मतदान करावं, असं आवाहन प्रविण तरडे यांच्या पत्नी स्नेहल तरडे यांनी केलं.
सुबोध भावेनेही केलं मतदान
आज सकाळी अभिनेता सुबोध भावे यानेही मतदान केलं. सुबोध भावे आणि त्याच्या पत्नीने मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्याने जास्तीत लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले. सध्याच्या राजकारणावर काहीही बोलणं मात्र त्याने टाळलं.
तुम्ही जर ठरवलं तरच बदल घडू शकेल..
अभिनेता सुबोध भावे याने पुण्यातील सिटी पोस्ट जवळील मतदान केंद्रावर पत्नीसह मतदानाचे कर्तव्य पार पडले. त्यानंतर त्याने माध्यमांशी संवाद साधला. ‘ आयुष्यात जेव्हा पहिल्यांदा मतदान करायला मिळालं तेव्हा मला सर्वात जास्त आनंद झाला होता. तेव्हापासून कुठलीही निवडणूक असली तरीही मी आणि माझ्या घरातले सर्वजण मतदान करतो, कोणतेही मतदान आम्ही बुडवत नाही. मतदान हे आमचे राष्ट्रीय आणि प्रथम कर्तव्य आहे, याची जाणीव आम्हाला आहे. जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडा असं मी मतदारांना आवाहन करीन, कारण तुम्ही जर ठरवलं तरच बदल घडू शकेल’ असे सुबोध भावे याने सांगितले.