‘कोरटकरांविरोधात लूकआऊट नोटीस म्हणजे…’; नेमकं काय म्हणाले असीम सरोदे?

| Updated on: Mar 22, 2025 | 3:34 PM

प्रशांत कोरटकर यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे, यावर आता इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

कोरटकरांविरोधात लूकआऊट नोटीस म्हणजे...; नेमकं काय म्हणाले असीम सरोदे?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

प्रशांत कोरटकर यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे, यावर आता इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. कोरटकरांविरोधात लूकआऊट नोटीस काढण्याची वेळ सरकारवर येणं ही फार मोठी घडामोड आहे. वरिष्ठ पातळीवरून सुद्धा या प्रकरणात लोकांनी लक्ष घातलं  आहे, असं दिसतयं. लूकआऊट नोटीस काढली याचा अर्थ प्रशांत कोरटकर यांच्या बॉर्डर हालचालींवर आता मर्यादा आल्या आहेत. ते भारतामध्ये असतील तर त्यांना आता भारताच्या बाहेर जाता येणार नाही, असं सरोदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, जर प्रशांत कोरटकर दुबईला गेले असतील तर ही गोष्ट महाराष्ट्र पोलिसांसाठी लांच्छनास्पद आहे. इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी कोल्हापूर पोलीस स्टेशनला एक अर्ज दिलेला आहे. यामध्ये कोरटकर यांच्या पत्नीला बोलवून त्यांचा पासपोर्ट ताब्यात घेण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. कोरटकर यांच्या पत्नी पासपोर्ट घेऊन येऊ शकल्या नाहीत तर कोरटकर फरार झाले आहेत. ते पासपोर्ट घेऊन फरार झाले असतील तर परदेशात जाण्याची शक्यता आहे, असं असीम सरोदे यांनी म्हटलं आहे.

कोर्टाच्या आदेशाने पोलिसांनी पासपोर्ट जप्त करावा अशी सुद्धा मागणी केलेली आहे. प्रशांत कोरटकर हे सोशल मीडियावर सक्रीय असलेले कथाकथित पत्रकार आहे. कोट्यवधी रुपयांच्या अनेक गाड्या त्यांच्याकडे आहेत, असं दाखवलं गेलेलं आहे. अत्यंत रिलॅक्स मोडमध्ये बसलेल्या अवस्थेत कोरटकर याचे पोलिसांसोबत फोटो आहेत.  त्याखाली कॅप्शन मध्ये लहान भाऊ, जवळचा मित्र असं लिहिलेल आहे. प्रशांत कोरटकर यांचे अनेक पोलिसांसोबत जवळचे संबंध आहेत.

कोरटकर प्रकरणाला महिना होऊनही त्यांना कोणी अटक करू शकले नाही. फडणवीस म्हणाले की कोरटकर हा चिल्लर माणूस आहे. चिल्लर माणसाला न पकडू शकणारे पोलीस अधिकारी हे अकार्यक्षमच असू शकतात असं महाराष्ट्रातील लोकांचं मत झालं आहे,  कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही चांगली परिस्थिती नाही, असं हल्लाबोल यावेळी सरोदे यांनी केला  आहे.