कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील निपाणी तालुक्यातील एका गावात नुकताच एक अजब प्रकार पहायला मिळाला. गर्दीतील उत्साही लोकांनी एका काळसर रंगाच्या इंडी (Indie) श्वानाच्या ( कुत्र्याच्या) गळ्यात माळा घालून त्याची मिरवणूक काढली. एवढेच नव्हे तर त्याच्या सन्मानाप्रित्यर्थ मेजवानीदेखील आयोजित केली होती. एका कुत्र्यासाठी एवढा खास समारंभ का ? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना.. तर हे नक्की वाचा ! हा कोणी साधासुधा श्वान नव्हे तर तो पंढरपूरच्या यात्रेत हरवून, नंतर तब्बल 250 किलोमीटरचा रस्ता तुडवून घरी परत आलेला श्वान आहे. प्रेमाने ‘महाराज’ अशी हाक मारल्या जाणाऱ्या या श्वानाचे घरी परत येणं हा एक चमत्कारचं आहे.
तो पंढरपूरच्या वारीदरम्यान गर्दीत हरवला होता. मात्र त्यानंतर त्याने एकट्यानेच पायी चालत तब्बल 250 किमीचा पल्ला पार केला आणि तो कर्नाटकमधील त्याच्या गावी परतला. त्यामुळे त्याचे घरचेच नव्हे तर संपूर्ण गावातील लोकही आश्चर्यचकित झाले होते. तो परत आल्याचा आनंद सर्वांनी मिळूनच साजरा केला.
कसा हरवला महाराज ?
जूनच्या शेवटच्या आठवड्यात कमलेश कुंभार वारीला गेले होते तेव्हा महाराजही त्यांच्यासोबत होता. दरवर्षी आषाढ एकादशी आणि कार्तिकी एकादशीला आपण पंढरपूरला जातो, असे कुंभार यांनी सांगितले.
यावेळेस आमचा स्वान, महाराज हाही सोबत आला होता. असे कमलेश यांनी एका एजन्सीशी बोलताना सांगितलं. महाराज याला भजन ऐकायला आवडतं. एकदा तो माझ्यासोबत महाभळेश्वर जवळी ज्योतिबा मंदिराच्या पदयात्रेतही आला होता.
मंदिरात दर्शनानंतर गायब झाला श्वान
यावेळी कमलेश हे इतर वारकऱ्यांसब भजन म्हणत म्हणत वारीला गेले, तेव्हा सुमारे 250 किमीचे अंतर पायी चालत, त्यांचा श्वान महाराज हाही सोबत गेला होता. मात्र मंदिरात पोहोचल्यावर विठुरायाचे दर्शन घेऊन कमलेश बाहेर आले आणि बघताता तर काय, कुत्रा गायब झाला होता. त्यांनी त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो काही सापडला नाही. तो दुसऱ्य़ा ग्रुपमागोमाग चालत गेल्याचे इतर लोकांनी त्यांना सांगितले.
तरीही कमलेश यांनी त्याला खूप शोधल, तो काही सापडला नाही. त्यामुळे तो खरंच दुसऱ्यांसोबत गेल्याचे कमलेश यांना वाटलं. अखेर 14 जुलै रोजी ते आपल्या घरी परतले. पण दुसऱ्याच दिवशी घराबाहेर आल्यावर त्यांना जे दृश्य दिसलं ते पाहून ते आश्चर्यचकितच झाले. महाराज (श्वान) त्यांच्या घरासमोरच उभा होता. काही झालंच नाही, अशा अविर्भावात, तो प्रेमाने शेपूट हलवत उभा होता, असे कमलेश म्हणाले. इतकं लांब अंतर पार करून तो घरी परतल्याचा सर्वांनाच आनंद झाला आणि त्याचप्रित्यर्थ गावकऱ्यांनी मेजवानी आयोजित केली.
250 किमीचं एवढं अंतर तुडवून श्वान घरी येणं हे गावकऱ्यांसाठी एक आश्चर्यच आहे. पण पांडुरंगानेच त्याला वाट दाखवली, अशी भावना गावकरी व्यक्त करत आहेत.