अहमदनगर : लम्पी रोगाचा प्रसार (Lumpy skin disease) माणसांमध्ये होत नाही. त्यामुळे घाबरून जाण्याचे काही कारण नाही, असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत. अहमदनगरला महसूल आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांच्या उपस्थितीत लम्पी रोगा संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. जनावरांचे लसीकरणासाठी आम्ही खासगी डॉक्टरांची मदत घेत असल्याची माहिती यावेळी विखे पाटील यांनी दिली. सेवाशुल्क वाढल्यामुळे अतिरिक्त भार शेतकऱ्यांवर (Farmers) येत आहे. तो काही कालावधीसाठी माफ करावा किंवा रद्द करावा, अशी विनंती वित्तमंत्र्यांना करणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जनावरांना लम्पी रोग झाला आहे, त्यांना जिल्हा परिषदेमधून तातडीने दहा हजार रुपये देण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच जी अतिरिक्त मदत राज्य सरकारकडून द्यायची आहे, त्याचा प्रस्ताव सरकारला आम्ही पाठवणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
लम्पी हा एक त्वचा रोग आहे. त्याचा संसर्ग झपाट्याने होतो. जनावरांच्या गोठ्यातील गोचिड, माश्या यांच्या मार्फत या लम्पी आजाराची लागण होते. यामुळे जनावरांना ताप येतो. जनावराच्या डोके, मान, पाय, छाती, पाठ, कास येथील त्वचेवर ते 5 से. मी. व्यासाच्या गाठी येतात. पायाला सूज येते. त्यामुळे जनावरांना नीट चालता येत नाही. जनावरांची तहान-भूकही कमी होऊन दूध उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. हा आजार माणसाला होत नाही.
शेतकऱ्यांनी जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. गोठ्यामध्ये कपारी असू नयेत. त्यामुळे गोमाशी आणि माशांचे प्रजोत्पादन होण्यास चालना मिळते. मंडळाच्या ठिकाणच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात लम्पी या संसर्गजन्य आजारावरील लसदेखील उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही कादगत्राशिवाय ही लस मोफत पुरवली जाते. गोठ्यामध्ये माशा, गोमाश्या, गोचिड वाढणार नाहीत, याची खबरदारी शेतकऱ्यांनी घ्यावी. एखाद्या जनावरास हा आजार झाल्यास सुमारे 5 किमीपर्यंत लसीकरण मोहीम राबवली जाते. त्यासाठी पशूसंवर्धन विभागाला माहिती देणे गरजेचे आहे.