पुणे | 1 ऑगस्ट 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज, 1 ऑगस्ट रोजी पुणे मेट्रो प्रकल्पाचे (Metro) उद्घाटन होणार आहे. फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट आणि रुबी हॉल ते गरवारे कॉलेज सहित मार्गावर पुणे मेट्रो प्रवाशांच्या सुविधेसाठी सुरू होणार आहे. या उद्घाटनानंतर महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला (महा-मेट्रो) या मार्गांवर दररोज एक लाखांहून अधिक प्रवाशांची अपेक्षा आहे.
गेल्या वर्षी वनाझ ते गरवारे कॉलेज आणि पिंपरी-चिंचवड महापालिका (PCMC) ते फुगेवाडी या मार्गांवर पुणे मेट्रो प्रवाशांसाठी खुली करण्यात आली. आज (मंगळवारी) पंतप्रधान मोदी हे फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट आणि रुबी हॉल ते गरवारे कॉलेज या मार्गावरील विस्तारित प्रवासी सेवेचे उद्घाटन करणार आहेत.
महा-मेट्रोचे संचालक( ऑपरेशन) अतुल गाडगीळ यांच्या सांगण्यानुसार, हे नवे मार्ग पुणे (पुणे महापालिका) आणि PCMC यांना मेट्रो नेटवर्कने जोडतील. यामुळे अधिकाधिक प्रवाशांना पुणे ते पीसीएमसी आणि तसाच उलटा प्रवासही बिनदिक्कतपणे करता येऊ शकेल.त्यामुळे पुणे मेट्रोच्या प्रवासी संख्येतही वाढ होईल.
त्यामुळे वनाझ ते रामवाडी आणि स्वारगेट ते पीसीएमसी असे मार्ग सुरू झाल्यानंतर दररोज लाखभराहून अधिक लोक मेट्रोने प्रवास करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड ( PMPML) मेट्रो स्टेशनना फीडरल सेवा प्रदान करेल, त्यामुळे प्रवाशांना मेट्रो स्टेशनपर्यंत पोहोचण्यास मदत मिळेल.
सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्टेशनमुळे प्रवाशांना सुलभपणे मार्ग बदलता येऊ शकेल, त्यामुळे पीसीएमसी ते वनाझ किंवा पीसीएमसी ते रुबी हॉलपर्यंत सहज प्रवास करता येऊ शकेल, असे गाडगीळ यांनी नमूद केले.
मेट्रोमुळे पुणे ते पीसीएमसी जोडले जाणार
मेट्रो अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, या विस्तारित मार्गांमुळे शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट, पीएमसी ऑफीस, पुणे आरटीओ आणि पुणे रेल्वे स्टेशन यासारख्या महत्त्वाचे भाग जोडले जातील. तसेच डेक्कन जिमखाना आणि संभाजी उद्यान ही स्थानके जंगली महाराज रोड (JM) आणि फर्ग्युसन कॉलेज (FC) रोडला जोडली जातील, ज्यामुळे हजारो पुणेकरांना या ठिकाणांपर्यंत पोहोचणे सोपे होईल.
सवलतीत प्रवास
या प्रवासासाठी पुणे मेट्रोने सवलत योजनाही आणली आहे. विद्यार्थ्यांना तिकीटदरात ३० टक्के सवलत देण्यात येणार आहे. पदवीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला या सवलतीचा लाभ घेता येऊ शकेल.
तसेच शनिवार व रविवार सर्वसामान्य नागरिकांनाही ३० टक्के सवलत मिळेल. तर मेट्रो कार्डधारकांना १० टक्के सवलत मिळणार आहे. मेट्रोचे भाडे १० ते ३५ रुपयांपर्यंत ठेवण्यात आले आहे. दर दहा मिनिटांनी मेट्रोची सेवा असेल.