Ramgiri Maharaj Controversial Statement : सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिकमधील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनादरम्यान प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. याप्रकरणी रामगिरी महाराज यांच्यावर तीन जिल्ह्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नाशिकमधील येवल्यात, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापुरात, अहमदनगरमधील तोफखाना आणि संगमनेरमध्येही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ आता नालासोपारा पोलीस ठाण्यातही रामगिरी महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी एका धर्माबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता याप्रकरणी महंत रामगिरी महाराज, सद्गगुरु गंगागिरी महाराज यांच्याविरोधात नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तसेच मुस्लिम धर्माविरुद्ध वादग्रस्त, बेछूट आणि बेताल वक्तव्य करून जाणीवपूर्वक, हेतुपरस्परपणे समाजात तेढ निर्माण करून, जातीय दंगल घडविणे, मान्यष्यहानी व वित्तहानी करण्याच्या उद्देशाने, बेकायदेशीररीत्या राष्ट्रीय एकात्मतेला बाधक व कायदा सुव्यवस्था निर्माण होईल, असे वक्तव्य केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे.
हिंदू मुस्लिम एकता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अहमद युसूफ मेमन यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता (बी.एन.एस)2023 चे कलम 192, 196, 197, 209, 302, 353 (2), 356 (3), 356 (2) प्रमाणे महंत रामगिरी महाराज उर्फ श्री गंगागिरी महाराज यांच्यावर नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामगिरी महाराज यांनी नाशिक जिल्ह्यातील मौजे पांचाळे याठिकाणी 16 ऑगस्ट रोजी प्रवचन आयोजित केले होते. यावेळी त्यांनी जनतेला उद्देशून बेछूट आणि बेताल वक्तव्य करीत धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. 177 वर्षांपूर्वी या सप्ताहाला सुरुवात झाली होती. 20 ते 25 लाख लोक येथे येतात. अखंड भजनात तल्लीन होतात. लोकांना भक्ती मार्गाला लावण्यासाठी या सप्ताहाच्या माध्यमातून आम्ही करतो. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. एक ते दीड कोटी लोक बॉर्डरवर उभे आहेत. भारतामध्ये प्रवेश मागत आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना आम्ही सांगितले हिंदूंनी मजबूत राहिले पाहिजे. अन्यायाला प्रतिकार केला पाहिजे, असे वक्तव्य महंत रामगिरी महाराज यांनी केले होते.
महंत रामगिरी महाराज यांच्या वक्तव्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरात तणाव निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. तर आतापर्यंत चार ठिकाणी महंत रामगिरी महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.