नाशिक : संभाजी राजे छत्रपती यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर आलेल्या संयोगिताराजे यांनी काळाराम मंदिरात दर्शन घेतले होते. यादरम्यान त्यांनी त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यावरून रामनवमीच्या निमित्ताने केलेल्या पोस्टवरून खळबळ उडाली होती. त्यावरून काळाराम मंदिराच्या पूजाऱ्यांवर सकाळपासून जोरदार टीका होऊ लागली आहे. यामध्ये सोशल मिडियावर टीका होऊ लागल्याने काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास म्हणाले, परम आदरणीय संयोगिता राजे भोसले या सर्वात प्रथम तर दोन दिवसांपूर्वी नाशिकला आलेल्या नव्हत्या. त्यांना येऊन साधारणता पावणे दोन महिने झाला आहे. आदरणीय संभाजी महाराजांचा वाढदिवस ज्या दिवशी होता त्याचा आदल्या दिवशी ताईसाहेब या मंदिरामध्ये आल्या होत्या.
संपूर्ण मंदिर परिसर त्या फिरल्या आहेत. मंदिराची संपूर्ण माहिती देखील मी त्यांना सांगितली आणि मंदिरामध्ये आत मध्ये आल्यानंतर आदरणीय संभाजीराजे भोसले यांचा वाढदिवस दुसऱ्या दिवशी होता. त्यांना आरोग्य प्राप्त व्हावं, आयुष्य प्राप्त व्हावं म्हणून या ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या चरणी आपण संकल्प केला.
संकल्पामध्ये श्रुती आणि स्मृती पुराणोक्त शास्त्रोक्त पुण्यफल प्राप्त असा उल्लेख मी त्या ठिकाणी केला. तर श्रुती या शब्दाचा अर्थ आहे की वेदानुसार केलेलं कर्म स्मृती शब्दाचा अर्थ आहे. सर्व स्मृतींमध्ये सांगितलेलं फळ हे प्राप्त व्हावं आणि पुराणोक्त फळ जे आहे ते प्राप्त व्हावं परंतु त्यांचा पुराणोक्त शब्दावरती आक्षेप होता.
त्यांनी सांगितलं की महाराज आम्ही छत्रपती घराण्याचे आहोत. आमचं पूजा त्यानुसार करण्यात यावं तर मी अत्यंत आदराने त्यांचा संपूर्ण सन्मान राखत त्या ठिकाणी सांगितलं की कुठल्याही यजमानांचं अभिषेक पूजन हे केल्यानंतर पुरुष सूक्त आणि भगवंताचे पूजन अभिषेक केला जातो.
त्यानुसार आपण अभिषेक करत असतो. त्यानंतर ताई पुन्हा तिथे संकल्पासाठी बसल्या सर्व पूजन केलं. मी प्रभू रामचंद्रांचा दिलेला प्रसाद तो देखील त्यांनी स्वीकारला आणि दक्षिणा देखील त्यांनी मला अकरा हजार रुपये दिली.
त्यानंतर मी त्यांना गाडी पर्यन्त सोडवायला गेलो. अतिशय आदराने मी वागलो आहे. गैरसमजातून हा विषय झाला असावा यासाठी आम्ही थोरले महाराज यांना भेटण्यासाठी कोल्हापूर जावून निवेदन करू असेही सुधीरदास महंत यांनी म्हंटले आहे.
याशिवाय सुधीरदास महंत यांनी यावेळेला संयोगीताराजे यांनी जो आक्षेप घेतला तो खरा आहे. तो मी नाकारत नाही असेही म्हंटले आहे. वेदोक्त पूजन करावं यासाठी आग्रह केला होता. असे महंत सुधीरदास पुजारी यांनी म्हणत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
संकल्प हा सरोळसोट सांगितला जातो. शाहू महाराज यांच्या त्या गोष्टीचा आणि पुजारी घराण्याचा संबंध नाही. मात्र, अलीकडे पुजारी आणि ब्राह्मण हे सॉफ्ट टार्गेट झाले आहे. व्यक्तीगत आरोप असू शकता पण माझ्या कडून छत्रपती घराण्याचा अपमान केलेला नाही. झाला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो असे महंत सुधीरदास यांनी म्हंटले आहे.