मुंबई | 16 मार्च 2024 : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. सर्व शाळांच्या दृष्टीने हा महत्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, आता राज्यभरातील प्रत्येक शाळेत शिक्षकांसाठी ड्रेसकोड लागू होणार आहे. शाळांमध्ये जसा विद्यार्थ्यांना गणवेश असतो तसेच आता शिक्षकांनाही ड्रेसकोड लागू होणार आहे. त्यामुळे आता शिक्षकांनाही शाळेत ठरवून देण्यात आलेले कपडे घालून यावे लागेल. राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी याबाबत महत्वाची घोषणा केली. एकाच रंगाचा ड्रेसकोड सर्व शिक्षकांनी वापरावा, शाळेत शिक्षकांनी जीन्स, टी-शर्ट वापरू नये अशा सूचना देखील सरकारकडून शाळांना देण्यात आल्या आहेत.
ड्रेसकोड लागू झाल्यावर काय होणार ?
राज्यभरातील शाळांमध्ये ड्रेसकोड लागू झाल्यानंतर शिक्षकांना त्यांच्या मनाप्रमाणे कोणतेही कपडे परिधान करता येणार नाहीत. शिक्षकांच्या कपड्याचा रंग कुठला असावा याबाबत शाळेने निर्णय घ्यावा असं शासनाने सांगितलं आहे. व्यवस्थापनाने नेमून दिलेले कपडे सर्व शिक्षकांना घालावे लागतील. या नियमाप्रमाणे महिला शिक्षकांसाठी साडी अथवा सलवार-चुडीदार, कुर्ता,दुपट्टा असा पेहराव असावा.
तर पुरूष शिक्षकांना शर्ट-ट्राउझर पँट घालावी लागेल. त्यांच्या शर्टचा रंग फिकट तर पँटचा रंग डार्क असावा. तसेच शिक्षकांनी शर्ट इन करणे बंधनकारक असेल. शिक्षकांनी शाळेत येताना जीन्स, टी-शर्ट वापरू नये अशा सूचना देखील सरकारकडून देण्यात आल्या आहेत. तसेच शिक्षकांनी कुठले बूट घालावेत, कशा चपला घालाव्यात, महिला शिक्षकांच्या चपला कशा असाव्यात याबाबत नियमावली ठरवण्यात आली आहे .
एकीकडे सरकारने शिक्षकांसाठी ड्रेसकोड लागू केला असेल तरी दुसऱ्या बाजुला त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारने घेतलेल्या आणखी एका निर्णयामुळे शिक्षकी पेशा आता स्टेटस सिम्बॉल होणार आहे. शिक्षकांना समाजात प्रतिष्ठेचे स्थान असल्याने शिक्षकांच्या नावाच्या आधी इंग्रजीत टीआर (Tr)आणि मराठीत टि असे संबोधन लावण्याची परवानगी देण्यात आली आहे.