कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 21 डिसेंबर 2023 : भिवंडीतील पडघा गावातील आयसीस मॉड्यूल प्रकरणी महत्वाची बातमी समोर आली आहे. NIA ने अटक केलेल्या साकिब नाचणच्या चौकशीतून अनेक महत्वाचे खुलासे झाले आहेत. सीरियामधील एका व्यक्तीला साकिबला भेटण्यासाठी पाठवलं होतं अशी माहिती उघड झाली आहे. काही दिवसांपूर्वीच NIA ने कर्नाटक आणि महाराष्ट्रात विविध ठिकाणी छापे मारले होते. त्यादरम्यान भिवंडीतील पडघा गावाजवळील बोरिवली गावामध्ये एक मोठं ऑपरेशन एनआयएतर्फे राबवण्यात आलं होतं.
त्यामध्ये जवळपास 15 जणांना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये महाराष्ट्रातील आयसीस मॉड्यूलचा नेता साकिब नाचण यालाही अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशीतन अनेक महत्वाचे खुलासे झाले आहेत.
सीरियामधून आलेल्या व्यक्तीने घेतली नाचणची भेट
परदेशात लपलेल्या काही हँडलर्सनी सीरियामधून एका व्यक्तीला साकिब नाचण याची भेट घेण्यासाठी पडघ्यातील बोरिवली गावात पाठवलं होतं. तेथे त्या दोघांची भेट झाली होती. येत्या काळात आयसीस मॉड्यूल कसं मोठं करायचं आणि घातपाताच्या कारवाया कश्या आणि कुठे करायच्या यासंदर्भात त्या दोघांमध्ये चर्चा झाली होती, अशी माहिती एनआयएच्या चौकशीतून समोर आली आहे.
नाचणने फेटाळले आरोप
मात्र साकिब नाचण याने हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. आयसिस मॉड्युलमध्ये माझा कुठलाही सहभाग नाही. आपण अश्या संघटनेसाठी काम करत नसल्याचं त्याने चौकशीत सांगितलं. शिवाय मी माझ्या समाजासाठी आणि अल्लाहसाठी जे एकनिष्ठ राहिलो, त्यासाठी गणला जाईन. माझ्या समाजामध्ये माझी प्रतिष्ठा तशीच राहील, असेही नाचण म्हणाला.
दुसरीकडे साकिब नाचण याचं कुठलंही बँक अकाऊंट नसल्याचंसुद्धा समोर आलं आहे. तो रिअल इस्टेटचा व्यवसाय करायचा आणि त्याद्वारे महिन्याकाठी त्याला 2 ते-3 लाख रुपये मिळायचे. आणि हेच पैसे या आयसीस मोड्यूलच्या आतंकवादी, दहशतवादी कारवायांसाठी वापरले जाणार होते. त्यासाठी लागणारी साधनसामग्री खरेदी करण्यासाठी तो हे पैस वापरत होता, असंही एनआयएच्या चौकशीतून समोर आलं आहे.
पण साकीब नाचनला भेटण्यासाठी एक व्यक्ती सीरियामधून महाराष्ट्रातील एका छोट्याशाा गावात येते आणि तपास यंत्रणांना आत्तापर्यंत त्याची कोणतीही माहिती मिळाली नाही, जराही सुगावा लागला नाही, हे धक्कादायक आहे. नाचणच्या चौकशीतून आत्ता हे सर्व समोर आले आहे.
साकिबने हे सर्व आरोप फेटाळले असले तरी आयसिस मॉड्यूलचा नेता म्हणून तो काम करत होता. अनेक नव्या तरूणांना या आयसिस मॉड्यूलमध्ये भरती करण्याचं काम त्याच्याकडे होतं. अनेक मुस्लिम तरूणांना पडघा गावात आणून तेथे त्यांच्या वास्तव्याची सोय करण्याकडे त्याचं लक्ष होतं, असंही एनआयएच्या तपासातून समोर आलं आहे. मात्र सीरियामधून आलेली ती व्यक्ती कोण होती आणि परदेशात लपलेले हँडलर्स कशा पद्धतीने हे आयसिस मॉड्यूल हँडल करत होते, याचा तपास एनआयए कडून करण्यात येत आहे. येत्या काळात आणखी काही जणांवर कारवाई होऊ शकते.